आ.विनायक मेटेंची रणनिती न.प.निवडणूकीत यश संपादन करणार
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : दिपावलीनिमित्त शिवसंग्रामच्या वतीने आज बीड शहरातील शिवसंग्राम भवन याठिकाणी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे, एमआयएमचे व शिवसंग्रामचे पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी येणाऱ्या बीड नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाची चर्चा झाली असून येणारी निवडणूक ही शिवसंग्राम, एमआयएम व वंचित बहुजन आघाडी एकत्र लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
गेल्या 35 ते 40 वर्षांपासून एकहाती सत्ता असणाऱ्या क्षीरसागरांच्या विरोधात आता इतर पक्ष एकत्र येताना दिसून येत आहेत. 40 वर्षांपासून एकहाती सत्ता असूनसुद्धा बीड शहरातील मुलभूत प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेले नाहीत. जे विकासकामे केली आहेत ते कामे सुद्धा दर्जेदार केलेली नसल्यामुळे अनेक नागरिकांना याचासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही तलावामध्ये भरपूर पाणीसाठा असून शहरकरांना 13 ते 15 दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. यात विशेष म्हणजे जे पंधरा दिवसाला पाणी सोडण्यात येते तेही पाणी कधी रात्री तर कधी पहाटे येत असल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. यासह इतर समस्यांच्या त्रासामुळे शहरकरांमध्ये एक रोष निर्माण झाला असून या रोषाचा रूपांतर मतदानपेटीत कशाप्रकारे येईल यासाठी आता येथील अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचअनुषंगाने शिवसंग्राम, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी जोमाने काम करताना दिसून येत आहे. आज एमआयएम, शिवसंग्राम, वंचित बहुजन आघाडी या तीनही पक्षाच्या पदाधिकारी शिवसंग्रामने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात एकत्र दिसून आले. यावेळी येणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असून येणारी बीड नगरपालिका निवडणूक व बीड जिल्ह्यातील इतर नगरपंचायतच्या निवडणूका वरील तिन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त होत आहे.