बीड (प्रतिनिधी):- शहरातील मुस्लिम बांधवांना सामाजिक उपक्रमांसाठी सद्भावना मंडप बांधकामासाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रमांतर्गत (पीएमजेव्हिके) मंजुरी देवून अधिकचा निधी द्यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याकडे केली. मंत्री नवाब मलीक यांनी यावर तातडीने कार्यवाही करून जागा उपलब्धतेसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी बीड व नगर पालिका प्रशासन यांना दिले आहेत.
बीड शहरातील विविध भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. मोमीनपुरा भागात नवीन शादीखाना बांधकामासाठी 25 लक्ष रूपयाचा निधी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मंजुर करून घेतल्यानंतर आता त्यांनी शहरातील मुख्य ठिकाणी मुस्लिम बांधवांना सामाजिक कार्यक्रम घेता यावा यासाठी सद्भावना मंडप बांधकाम यासाठी अधिकचा निधी मिळावा म्हणून त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याकडे मागणी केली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित व नव्याने विकास कामे करण्यासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अधिकचा निधी बीड शहरासाठी देवू अशी ग्वाही दिली.
बीडमध्ये मुस्लिम समाज बांधवांना सामाजिक व इतर कार्यक्रम घेता यावेत यासाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रमांतर्गत या सद्भावना मंडपची उभारणी करण्यासाठी मंजुरी देवून अधिकचा निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीची अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी तातडीने दखल घेत अल्पसंख्यांक विभागासह जिल्हाधिकारी बीड, नगर पालिका प्रशासन यांना जागेसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.