न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही’ — डॉ. गोऱ्हे; सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
बीड : जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “गौरी पालवे–गर्जे यांचा मुंबईतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबाने काही महत्त्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली; परंतु त्यांची नोंद झाली नव्हती. या तक्रारीची मी तत्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले असून, पुढील दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे.”
कुटुंबीयांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांनाही अटक करावी, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गौरीवर पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
“उपसभापती म्हणून जबाबदारी आहेच, पण आई म्हणूनही हे प्रकरण मन हेलावून टाकणारं आहे. कुटुंबीयांना सक्षम सरकारी वकील मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे. तपासात कुठलाही दबाव सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई पोलिसांना दोन महत्त्वाचे निर्देश दिले—
पहिला, तपासाच्या प्रगतीबाबत अधिकृत बुलेटीन दर दोन दिवसांनी पत्रकारांना देण्यात यावे, जेणेकरून अफवा आणि अप्रमाणित माहितीला आळा बसेल.
दुसरा, अशा संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडितेवरच आरोप केले जातात; म्हणून संपूर्ण सुनावणीचे इन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच जवळील गावातील एका पॉक्सो प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात उशीर झाल्याबाबतही त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. “महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींची त्वरित आणि गांभीर्याने नोंद होणे आवश्यक आहे. गावांमध्ये पॉक्सो कायद्याबाबत जागृती वाढवण्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. पॉक्सो प्रकरणातील पीडित मुली आणि पालकांना तपासाच्या प्रगतीची नियमित माहिती देण्याबाबत भारतीय न्यायसंहितेतील नव्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.
कुटुंबाला न्यायप्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी आर्थिक मदत
गौरी पालवे–गर्जे यांचे आई-वडील न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक ती आर्थिक मदत वैयक्तिक पातळीवरून कुटुंबीयांना दिली आहे. “न्याय मिळविण्यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. कुटुंबाच्या पाठीशी मी वैयक्तिकरीत्या उभी आहे,” असे त्या म्हणाल्या.
“गौरीच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. न्याय मिळण्यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा तितक्याच कटाक्षाने काम करतील,” असा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

















