बीड: राज्यात नगरपालिका निवडणूक सुरू आहे. दि.२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची दि.१ डिसेंबर रोजी परीक्षा आहे. या परिक्षेमुळे परिक्षार्थींना वेळेत मतदान करण्यासाठी शक्य होणार नाही. करिता, सदरील परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, पुणे महानगरपालिकेची भरती प्रक्रियेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा दि.१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तथापि, दि.२ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका/नगरपंचायत निवडणुकीचे मतदान आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी असलेले परीक्षार्थी हे राज्यातील विविध भागातून परीक्षेला येणार आहेत. त्यांच्यासाठी पुणे येथे येऊन परीक्षा देऊन लगेच मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजावणे जिकिरीचे आहे. तसेच बरेचसे परीक्षार्थी हे सध्या शासकीय सेवेमध्ये कार्यरत असून ते २ डिसेंबर रोजीच्या निवडणुक कर्तव्यावर आहेत. त्यामुळे त्यांना डिसेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर हजर होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहणे शक्य होणार नाही. यामुळे पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. तसेच, पुनश्च: परीक्षा आयोजित करताना फक्त टीसीएस आयओएन केंद्रावर आयोजित करावी जेणेकरून पारदर्शकता, सुव्यवस्था राखली जाईल, अशी मागणी केली आहे. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे हे सर्व घटकांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पहात असल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे.

















