आष्टी प्रतिनिधी : आष्टी–पाटोदा–शिरूर (कासार) तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरक्षिततेची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, बीड येथील कार्यकारी अभियंत्यांना औपचारिक निवेदन सादर करून दिवसा वीजपुरवठा देण्याची तातडीची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून या तीनही तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून नागरिकांसह शेतकरी भयभीत आहेत. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी बिबट्याची हालचाल वाढत असल्याने रब्बी पिकांना पाणी देणे, कांद्याची लागवड, तसेच ऊसतोडणीसारखी कामे मोठ्या अडचणीत आली आहेत. ऊसतोडणी मजूरदेखील रात्रीच्या वेळी काम करण्यास स्पष्ट नकार देत आहेत.सध्या महावितरणकडून शेतीपंपांना रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत वीजपुरवठा केला जातो. मात्र, या काळात बिबट्याचा धोका अत्यंत जास्त असल्याने शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. शेतीची सर्व कामे ठप्प झाले असून ही परिस्थिती लक्षात घेता शेतीपंपांसाठी दिवसभरात किमान ८ ते १० तास सातत्याने वीजपुरवठा देण्यात यावा, अशी आमदार धस यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी सुरक्षितपणे कार्यरत राहू शकतील तसेच ऊसतोडणी मजुरांना देखील भयमुक्त वातावरणात काम करणे शक्य होईल, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या सुरक्षेला आणि हंगामी पिकांच्या तातडीच्या गरजेला प्राधान्य देऊन महावितरणने या मागणीची त्वरित दखल घ्यावी असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
चौकट
बिबट्याचा मुक्त वावर…
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी,घाटा–पिंपरी, धामणगाव रोडवरील घाटा पिंपरी जवळील घाट परिसरात वनविभागाच्या परिक्षेत्रात बुधवार दि.१९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून दर्शन करून परत येत असताना आष्टी सद्गुरु ग्रुपच्या युवकांना बिबट्या नगर-बीड महामार्ग ओलांडताना दिसला.या भागात वन्यप्राण्यांची वर्दळ वाढल्याने या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी सतर्कता बाळगावी विशेषता दुचाकी वरील प्रवाशांनी सावधगिरीने या मार्गावरून प्रवास करावा परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.














