बीड : बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रोजी सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ब्रिजेशकुमार सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व इतर अधिकारी यांनी आज बीड येथील रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. बीड-नगर रेल्वेला 17 सप्टेंबरला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जनता या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था कशी असायला पाहिजे, पार्किंग व्यवस्था कशी असावी, व्हीआयपी आणि इतर रस्ते याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे स्वत: प्रत्येक बाबींचा आढावा घेवून नियोजन करत आहेत.
यावेळी रेल्वे प्रशासनातर्फे उपमुख्य अभियंता डी.डी. लोळगे, उपमुख्य अभियंता (इलेक्ट्रीक) ज्ञानेंद्रसिंग, रेल्वे विभागाचे विभागीय अधिकारी जितेंद्र सिंग व वरिष्ठ समन्वयक विजयकुमार रॉय तसेच अधिकारी उपस्थित होते . ही प्राथमिक पाहणी असून बैठक व्यवस्था व इतर मार्ग याबाबत सविस्तर माहिती पुरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यावेळी सांगितले.