धनंजय मुंडेंकडून कुटुंबीयांना एक लाखांची तातडीची मदत, स्व. नितीन चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची मुंडेंनी स्वीकारली जबाबदारी
राज्य शासनाकडून मदत मिळण्यासाठी करणार पाठपुरावा
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती; माजी मंत्री तथा परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने श्री मुंडे यांनी मयत नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीची एक लाख रुपयांची मदत केली असून, स्व नितीन चव्हाण यांना दोन मुली आहेत, त्या दोन्हीही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचे यावेळी कुटुंबियांना सांगितले.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून, स्व. नितीन चव्हाण यांच्याही कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण, तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, बबन लोमटे, आबा पांडे, विलास बापू मोरे, अजित गरड, रणजित लोमटे, प्रवीण जगताप, गुणवंत आगळे, उपसरपंच गणी भाई, नामदेव शिंदे यांसह पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते.