लोकमत वृतपत्र समुहाने केला सन्मान; लंडन येथे पार पडला दिमाखदार सोहळा
मुंबई। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना त्यांच्या खात्यातील उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृतपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.
लोकमत वृतपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकाॅनाॅमिक कन्व्हेन्शन’ ही जागतिक परिषद पार पडली.
ज्यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे अशा व्यक्तींना लोकमत वृतपत्र समूहाने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या कुशल व अभ्यासू मार्गदर्शनखाली पर्यावरण व पशुसंवर्धन विभागात उल्लेखनीय काम करून एक नवा आयाम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमत चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.
चर्चासत्रातही सहभाग
महिलांनी मूल्यसंस्कार, देशाची समृध्द संस्कृती आणि वारसा जपत उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले आहे, या विषयावर परिषदेत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, यातही ना. पंकजाताई मुंडे यांनी सहभाग घेत आपली सडेतोड भूमिका मांडली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीमुळे राज्याच्या विकासात्मक प्रक्रियेत मला योगदान देता येत आहे. आजपर्यत केलेल्या कार्याचा आणि माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे, असं ना. पंकजाताई मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.