बीड: परळीत महादेव मुंडे यांची हत्या होते परंतु २१ महिन्यात पोलीसांना आरोपी सापडत नाहीत. आरोपी पोलीसांच्या नाकावर टिच्चून परळीत फिरतात. हे कोणाच्या आशीर्वादाने चालते. परळीत ज्याला मारले त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात, त्यांनाच जेलमध्ये टाकले जाते. परळीत दहशत माजविणारी अजूनही मोठी टोळी बाहेर सक्रीय असल्याचा आरोप खा.बजरंग सोनवणे यांनी केला.
बीड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या कुटूंबियांना न्याय देण्याच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी सर्वधर्मिय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, आ.प्रकाश सोळंके, शिवसेना जिल्हाप्रमूख सचिन मुळूक, अनिल जगताप, बाळा बांगर, कुंडलिक खांडे, संतोष जाधव, हनुमान मुळीक, शेख शफीक, राजाभाऊ फड यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, महाराष्ट्रात जिथे अन्याय होतो, तिथे मनोज जरांगे पाटील आणि जिथे पाटील तिथे आम्ही उभा आहोत. आज महादेव मुंडे यांची पत्नी आपल्या सर्वांची ही बहीण २१ महिन्यापासून न्याय मागत आहे. त्यांच्या मागणीचा कोणी विचारत नाही. आज काही खून समोर आले आहेत. परंतु त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही. मग मुख्यमंत्री काय करतात. परळीत तेच मारणार आणि तेच खोटे गुन्हे दाखल करत आहे. यामुळे कोणी तरी समोर येऊन बोलणे आवश्यक आहे. बाळा बांगर यांनी पुढे येऊन मांडणी केली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली पण त्याची ऑर्डर येईपर्यंत त्यांचे काही खरे मानू नका. एसआयटीमध्ये पंकज कुमावत आले तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. दरम्यान, कालपासून महादेव मुंडे प्रकरणात काही आरोपींना अटक झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु कोणालाही अजून अटक झाली नाही. पोलीस यंत्रणाच अशी अफवा पसरवित असावी. परळीतील पोलीस गेंड्याचे कातडे पांघरून फिरत आहेत. केवळ पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी बदलून चालणार नाही तर खालची यंत्रणा देखील बदलली पाहिजे. आज सुद्धा परळीची टोळी सक्रिय आहे. जेलमध्ये देखील त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. बीडचा खासदार म्हणून मी कायम या लढ्यात सोबत आहे. मनोज जरांगे पाटील हे देतील तो आदेश पाळून आम्ही काम करू, असा शब्दही बजरंग सोनवणे यांनी दिला.