गेवराई ( प्रतिनिधी ) पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. जायकवाडी धरण 80.70 टक्के भरले असून धरणात मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातील गोदावरी पात्रालगत असलेल्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून आपल्यासह पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहून, गोदावरी नदीपात्रात जाऊ नये. प्रशासनाच्या संपर्कात राहून दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे. मिळालेल्या सूचना आणि माहिती गावातील इतर सर्व नागरिकांना द्याव्यात. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. मात्र त्यासोबतच गोदापट्ट्यातल्या सर्व गावकऱ्यांनी सतर्क रहावे. नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे, मोटारी, विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित ठेवावे. नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. तशा पद्धतीची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन बदामराव पंडित यांनी करून, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन गावातील सर्व तरुणांनी गावकऱ्यांची काळजी घ्यावी. कोणाच्याही मालाची अथवा कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुठलीही समस्या उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना सूचित करावे, असे आवाहनही बदामराव पंडित यांनी केले आहे.