राज्यभरातून नागरिकांची तोबा गर्दी ; प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकली ; जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण
मुंबई : राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेला जनता दरबार अक्षरशः हाऊसफुल्ल झाला. राज्यभरातून आपापल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत ना. पंकजाताईंनी त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.
भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला मंत्री महोदयांचा ‘जनता दरबार’ हा उपक्रम जाहीर करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पहिला जनता दरबार घेण्याचा मान ना. पंकजाताई मुंडे यांना मिळाला. आज दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ना. पंकजाताईंनी जनता दरबार घेतला. राज्याच्या विविध भागातून आपल्या समस्या घेऊन लोकं आली होती. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, त्यांची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या प्रश्नांचे जागेवर निराकरण केले. पर्यावरण व पशुसंवर्धन विभागासह अन्य विभागाची कामे घेऊन आलेल्या कामांचाही त्यांनी यावेळी निपटारा केला.
भाजपचा हा उपक्रम खरोखरच स्त्युत्य असा आहे, या पहिल्याच जनता दरबाराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य जनतेशी थेट संवाद साधता आला असं जनता दरबार झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.