राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या आश्रमशाळेच्या वस्तीगृह इमारतीचे ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते थाटात भूमिपूजन
मराठी शाळेतूनच संस्कारक्षम माणसे घडतात
जालना । राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या आन्वी येथील संत भगवान बाबा आश्रमशाळेच्या वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात झाले.
आन्वी (ता. बदनापूर) येथील पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेच्या संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या नवीन वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन आज राज्यपाल बागडे व ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमाकडे जात असताना रस्त्यात अकोला (निकळक), आन्वी तसेच गावोगावी ग्रामस्थांनी रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत ना. पंकजाताई व राज्यपाल बागडे यांचे वाजतगाजत जोरदार स्वागत केले. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत भगवान बाबा आश्रमशाळेत संस्थेच्या वतीने ना. पंकजाताईंचे स्वागत करण्यात आले.
*ना. पंकजाताई मुंडे*
———-
शिक्षक हे आपल्या जीवनात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात. गुरु कधीही मुलांवर वाईट संस्कार करत नाहीत. योग्य ती दिशा दाखविण्याचे कार्य हे गुरुवर असते. तर दाखविलेल्या योग्य वाटेवर चालण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. आणि स्वत:च्या मनावर ताबा ठेवत, जो संस्कार ग्रहण करतो तोच जीवनात यशस्वी होत असतो. तथापि मराठी शाळेतूनच संस्कारक्षम माणसे निपजली जातात, असं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
मराठी शाळेत संस्कारक्षम पिढी घडविण्याची सक्षमता आहे. जिल्हाधिकारी, शासकीय अधिकारी, मंत्री पदापर्यंत झेप घेतलेल्या व्यक्तींचे शिक्षण हे मराठी शाळेमधूनच झाल्याचे आपल्याला दिसून येईल. संघर्षामधूनच इतिहास घडत असतो, त्यामुळे शॉर्टकट वापरुन पुढे जाण्याचा विचारसुध्दा मनात येवू देवू नका. मैदानी खेळ खेळा, शिक्षण घ्या आणि आपले जीवन यशस्वी करा असेही त्यांनी सांगितले. आज गावच्या गावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत, या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम शासनाने केले आहे असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.