जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करताच तात्काळ पाणी सोडण्याचे जरांगे पाटलांना दिले आश्वासन
गेवराई | प्रतिनिधी |
तालुक्यातील गोदावरी नदी पात्र कोरडेठाक पडले असून गोदाकाठच्या अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याने आज गोदाकाठच्या अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व आपण गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. दरम्यान या मागणीची दखल घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी तात्काळ बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याशी संपर्क करून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची विनंती केली असता जिल्हाधिकारी यांनी याबाबत संबधित विभागाशी पत्र व्यवहार करून तात्काळ पाणी सोडण्याचे अश्वासन जरांगे पाटील यांना दिले आहे.
मार्च महिना सरत आला असून जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असून गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरीच्या काठावर असलेल्या नागझरी, खामगाव, सावळेश्वर, म्हा. पिंपळगाव, गंगावाडी, राक्षसभुवन, पांचाळेश्वर व अंबड तालुक्यातील शहागड, गोरीगंधारी, डोमलगाव, साष्टी पिंपळगाव, बळेगाव यासह गोदाकाठच्या अनेक गावांना गेल्या महिनाभरापासून पाणी टंचाई जाणवत असल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
याबाबत अनेकवेळा मागणी करूनही गोदावरीत पाणी सोडण्यात येत नसल्याने आज गोदाकाठच्या अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आंतरवली येथे जाऊन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर घातली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी तात्काळ बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना संपर्क करून दोन दिवसात गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाशी पत्र व्यवहार करून तात्काळ पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी
भाऊसाहेब नाटकर. अँड नारायण शिंदे, सुभाषराव केरूळकर, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब उदे, भाऊसाहेब डिंगरे, बाळासाहेब खेडकर, मुकेश कुटे, ऋषिकेश उदे, शरद अबुज, किशोर सुरवसे, अजय उदे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती.