गेवराई प्रतिनिधी ः- कोट्यावधी रुपये खर्च करूनही शहरातील नागरीकांना नियमित स्वच्छ पाणी का मिळत नाही ? असा सवाल उपस्थित करून आ.विजयसिंह पंडित यांनी व्यापारी गाळ्यांचे लिलाव, शहरातील अस्वच्छता, बंद पडलेले पथदिवे, मालमत्ता करात केलेली बेसुमार वाढ, अतिक्रमण धारकांच्या हक्काचे पीटीआर, रखडलेला हद्दवाढीचा प्रस्ताव, अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्या यांसह विविध प्रश्नांवर नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले. सध्या पालिकेवर प्रशासक आहे, त्यामुळे कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडून सर्वसामान्यांची कामे अडवू नका, सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही असा इशारा आ.विजयसिंह पंडित यांनी दिला. नगर परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित, पालिकेचे प्रशासक विक्रम मांडूरगे यांच्यासह कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी शुक्रवार, दि.७ फेब्रुवारी रोजी गेवराई नगर परिषदेची आढावा बैठक घेवून सर्वसामान्यांच्या मुलभूत समस्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला. या बैठकीत माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेवून मार्गदर्शन केले. पाणी पुरवठा योजनेसाठी ६६.७८ कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला असतानाही शहरातील नागरीकांना दररोज मुबलक स्वच्छ पाणी का मिळत नाही ? असा सवाल आ.पंडित यांनी उपस्थित केल्यामुळे आजवर विकासाचा गाजावाजा करणाऱ्या तथाकथीत कार्यसम्राटांच्या बोगसगिरीचा पडदाफाश झाला. नागरीकांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले एक्सप्रेस फिडर आणि जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ.पंडित यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. या बैठकीत बचतगटाच्या महिलांना कर्ज रक्कमेचे धनादेश आ.पंडित यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
संजयनगरसह अतिक्रमण भागातील नागरीकांवर आजवरच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा उपस्थित तक्रारादांनी या बैठकीत वाचला. कोणताही राजकीय भेदभाव न करता नियमाप्रमाणे पात्र असतील त्यांना तात्काळ हक्काचा पीटीआर देण्याचे निर्देश देताना आ.पंडित यांनी या प्रक्रियेतील दलालांचा बंदोबस्त करण्याची सूचना त्यांनी केली. गुगल फॉर्ममध्ये नागरीकांकडून अर्ज आजपासून भरून घेणे सुरु करत असल्याचे आश्वासन यानिमित्ताने मुख्याधिकाऱ्यांनी दिले. पालिकेला नवीन अग्निशमन वाहन खरेदी करण्यासह अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदाने या बाबतची कार्यवाही दोन दिवसांत करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शिवजयंतीपूर्वी नागरीकांसाठी खुले करण्याचे निर्देशही आ.पंडित यांनी या बैठकीत दिले. नाट्यगृह आणि जलतरण तलाव कार्यान्वित करण्याची सूचना देवून शहरात महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी शौचालय सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यानिमित्ताने दिले.
गेवराई शहरात भुमिगत गटार योजना, मुख्य रस्त्यांचे नुतणीकरण व सुशोभिकरण करणे, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करून त्यावर फुटपाथ, डिव्हायडर बसविणे, जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर भव्य शॉपिंग कॉम्पलेक्स उभारण्यासह शहरातील विकास कामे करण्यासाठी आपण तत्पर असल्याचे आ.विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीच्या निमित्ताने गेवराई शहराबाबतचे व्हिजन त्यांनी लोकांसमोर मांडले. बैठकीत उपस्थित तक्रारदारांच्या तक्रारींचे त्यांनी तात्काळ निराकरण केले. घरकुलाचे अडकलेले हप्ते, दिव्यांगांना मिळणारे लाभ या बाबतच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. स्मशानभुमीत काम करणाऱ्या कामगाराचे मागील पाच वर्षांपासून वेतन थकीत असल्याप्रकरणी अतिशय कडक शब्दांत प्रशासनाला सूचना देत अशा कामगारांचे वेतन भविष्यात अडवू नका अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. नगर पालिका प्रशासनाच्यावतीने नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बैठकीला आ.विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*चौकट*
=============
साडे चारशे टक्के मालमत्ता करात वाढ करणारी गेवराई एकमेव नगर परिषद
गेवराई शहरातील नागरीक विशेषतः व्यापाऱ्यांनी निवासी आणि वाणिज्य मालमत्ता करामध्ये झालेल्या वाढी बाबतची तक्रार या बैठकीत केली. व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांनी गेवराई नगर परिषदेने मालमत्ता करात साडे चारशे टक्के एवढी मोठी करवाढ केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या अनुषंगाने आ.पंडित यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तत्कालीन नगर पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी ही वाढ केल्यामुळे ती कमी करण्याचे अधिकार प्रशासकांना नसल्याचे सांगितले.
नागरीक आणि व्यापारी यांनी या अन्यायकारक करवाढी विरोधात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि गरज भासल्यास शासन स्तरावर प्रयत्न करून तोडगा काढणारअसल्याचे आश्वासन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिले. एकंदरीतच तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शहरातील नागरीकांना मालमत्ता करात वाढ करून दिलेल्या या धक्क्याची चर्चा गेवराई शहरात यानिमित्ताने पुन्हा एकदा झाली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि गेवराई नगर पालिका यांचे कर सारखे असून बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर क-वर्ग दर्जाच्या कोणत्याही नगर पालिकेपेक्षा गेवराईची कर आकारणी अधिकची असल्याची तक्रार उपस्थितांनी यावेळी केली.