ना. पंकजाताई मुंडे यांनी जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत जागेवरच केला कामाचा निपटारा
मुंबई : आक्रमक, अभ्यासू आणि कायम लोकांच्या गराडयात असणाऱ्या नेत्या म्हणून ज्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे, अशा राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा मंत्रालयातील चौथा मजला आज पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकांच्या गर्दीत गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. या गर्दीने २०१४ ते १९ च्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
ना. पंकजाताई मुंडे यांना मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर ४०३ क्रमांकाचे दालन मिळाले आहे. योगायोग असा की, २०१४ ते १९ याकाळात ग्रामविकास मंत्री असताना त्यांचे याच ठिकाणी दालन होते, तेच दालन त्यांना आता मंत्री झाल्यावर मिळाले आहे हे विशेष! ना. पंकजाताई मुंडे आज दुपारी मंत्रालयातील दालनात येण्यापूर्वीच लोकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात प्रशासकीय अधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण व शुभेच्छा देण्यासाठी आले होते. या सर्वांच्या सदिच्छांचा स्विकार त्यांनी केला. याशिवाय राज्याच्या विविध भागातून बरीच मंडळी आपल्या समस्या घेऊन आली होती. ना. पंकजाताईंनी नेहमीप्रमाणे सर्व नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.