बीड जिल्ह्यात हमी भाव खरेदी केंद्रांवर आता सोयाबीन खरेदीस हेक्टरी 9.50 क्विंटल वरून 21.51 क्विंटल इतकी वाढ
मुंबई – बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश आले आहे. बीड व लातूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमी भाव खरेदी केंद्रांना प्रति हेक्टरी उत्पादकतेची जी मर्यादा देण्यात आली होती, त्यात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांवर आता प्रति हेक्टरी 9.50 क्विंटल ऐवजी 21.51 क्विंटल इतकी वाढ करण्यात आली असून लातूर जिल्ह्यात देखील प्रति हेक्टरी 12.30 क्विंटल वरून ही मर्यादा वाढवून 19.99 क्विंटल करण्यात येत असल्याचा निर्णय सहकार व पणन विभागाने घेतला आहे.
राज्याचे कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी यावर्षी हमीभावाने अधिकृत खरेदी केंद्रांच्या मार्फत शेतकऱ्यांची सोयाबीन किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सोयाबीन खरेदीसाठी प्रति हेक्टरी 9.50 क्विंटल इतकी मर्यादा पणन विभागाने निश्चित केली होती.
या मर्यादेमुळे शेतकऱ्यांच्या समोर उर्वरित सोयाबीनचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मर्यादेत वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केली जावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी लावून धरली होती. अखेर मुंडेंच्या या मागणीस यश आले असून आता बीड जिल्ह्यात अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची प्रति हेक्टरी 9.50 क्विंटल ऐवजी 21.51 क्विंटल पर्यंतची सोयाबीन शेतकऱ्यांना हमीभावाने विकता येणार आहे. ,