बीड प्रतिनिधी : आमदारांनी पूर्वी काय केलं आणि ते भविष्यात काय करणार हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून योग्य तो निर्णय घ्या. सुज्ञ माणसांनी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आणि आपली भूमिका बजावावी, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीडमध्ये वकील संघाची संवाद बैठक शुक्रवारी (दि.१५) पार पडली. यावेळी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.डी.येवले, उपाध्यक्ष ए.एम.गाडगे, ॲड.नितीन वाघमारे, सचिव ॲड.सय्यद यासेर पटेल, कोषाध्यक्ष ॲड.धनंजय गिराम, ग्रंथपाल सचिव ॲड.भीमा जगताप, महिला प्रतिनिधी छाया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, माझ्या कार्यकाळात कोर्टाची अत्यंत भव्य दिव्य व दर्जेदार इमारत बांधली. माझ्या कार्यकाळात औरंगाबादमध्ये ५ फ्लाय ओव्हर बांधले. त्याच धर्तीवर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला एक उड्डाणपूल करण्याचा माझा मानस होता. त्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी पण मंजूर केला होता. परंतु काही लोकांनी आक्षेप घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धुळ लागेल म्हणजे त्यांना शहराचा विकास होऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्यांनी विरोध केला. वास्तविक पाहता वीज, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या जनतेच्या ५ मूलभूत गरजा आहेत आणि त्या पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. त्यामुळे भविष्यकाळात आपल्याला चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सर्वांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संधी द्यावी असे ते म्हणाले.
वकील संघाच्यावतीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड.नागेश तांबारे, ॲड.रोहिदास येवले, ॲड.राजू शिंदे, ॲड.नितीन वाघमारे, ॲड.अविनाश गडगे, ॲड.सय्यद यासेर, ॲड.श्रीकांत जाधव, ॲड.भीमा जगताप, ॲड.छाया वाघमारे, ॲड.अजय तांदळे, ॲड.अनिल तिडके, ॲड.संतोष माने, ॲड.विष्णुपंत काळे, ॲड.महेश गर्जे, ॲड.सचिन काळे यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.डी. येवले, ॲड.एन.पी.वाघमारे, ॲड.राजेंद्र राऊत, ॲड.दत्तात्रय डोईफोडे, ॲड.प्रवीण राख, ॲड.संगीता धसे, ॲड.वर्षा दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. विष्णुपंत काळे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. सदाशिव रहिंज यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीस बीड शहरातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
सुज्ञ वकील बांधव साथ देतील;
डॉ.योगेश क्षीरसागरांचा विश्वास
डॉ.योगेश क्षीरसागर पुढे म्हणाले की, मागच्या ५ वर्षाच्या आमदारकीचा कारनामा आपण सर्वांनी पाहिलेला आहे. एकदा निवडून गेल्यानंतर हे आमदार तुम्हाला कुठे दिसले का? मागच्या ५ वर्षात बीड मतदारसंघात एकही चांगला प्रोजेक्ट त्यांना आणता आला नाही. अण्णांच्या काळात अनेक विकासकामे झाली. आम्ही नगरोत्थानच्या माध्यमातून कॅनॉल रोड, पेठ रोड बीडचे रस्त्याची कामे दर्जेदार केली. परंतु शहर जसे वाढले तसेच शहराच्या गरजाही वाढल्या. त्याचा मोठा भार बीड नगरपालिकेवर पडत आहे. मी देखील पाण्यात पडल्यावर पोहायला शिकलो. उमेदवारीसाठी मोठ्या संघर्ष करावा लागला. अनेक घडामोडी घडल्या मात्र अण्णांचा पाठिंबा आणि आशीर्वाद भेटला. त्यामुळे आपली ताकद वाढली. आपला पुढचा प्रवास चांगला होणार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अण्णा सुद्धा एका चांगल्या पदावर दिसतील आणि आम्ही दोघे मिळून मतदारसंघाचा चांगला विकास करू. बीड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आम्ही पालीवरून पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी प्रस्ताव देखील पाठवलेला आहे, असे ते म्हणाले. मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी सुज्ञ वकील बांधव साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.