परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत व्यापारी स्नेह मिलन संपन्न
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सर्वांच्या सहकार्याने भरारी घेऊ – मुंडेंचा शब्द
परळी वैद्यनाथ – स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी बाजार समितीच्या नावे विकत घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क आहे, व्यापारपेठेची वृद्धी करताना ही जमीन अत्यंत अल्प दरात व्यापारी बांधवांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत बोलताना व्यक्त केले आहे.
मंगळवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी तालुक्यातील व्यापारी बांधवांचा दीपावली निमित्त स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.
काहीजण जाणीवपूर्वक परळीत दहशत दादागिरी म्हणून, व्यापाऱ्यांना अडचण म्हणून नेहमीच परळीची बदनामी करत आहेत. मात्र खरोखर परळीत व्यवसाय करणाऱ्या लहानात लहान व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यवसायिकांपर्यंत कुणालाही कधीही जाऊन भेटा आणि विचारा मी किंवा माझ्या सहकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना आहे का? मी परळीत मोठ मोठे महोत्सव घेतले माझ्या नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याचा खर्च केला परंतु परळीतील एकाही व्यावसायिक बांधवांकडून कधी एक रुपया सुद्धा वर्गणी मागितलेली नाही असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले.
सिरसाळा येथे 2200 एकर जागेमध्ये एमआयडीसी उभारण्यास मंजुरी मिळाली आहे त्यापैकी 78 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली असून या भागात उद्योग उभारणीसाठी पोषक पूरक सुविधा उपलब्ध केल्या जातील. तसेच इथे येणाऱ्या उद्योजकांना अत्यंत स्वस्त दरात ही जमीन उपलब्ध करून द्यावी लागेल तेव्हाच मोठे उद्योग या ठिकाणी आकर्षित होतील. आगामी काळात हे देखील पूर्ण करून आंबेजोगाई, परळी, शिरसाळा ते दिंद्रुड पर्यंत उद्योगांचे जाळे उभे राहील असा व्यापार व उद्योग क्षेत्रात भरारी घेण्याचा मानस असून त्या दृष्टीने मी नियोजन करत आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
मला स्वतःला कोणताही उद्योग व्यवसाय करण्यात किंवा संस्था उभारण्यात रस नाही, मलनाथपूर भिलेगाव परिसरात 250 एकर जमिनीवर शापूरजी पालनजी या सुप्रसिद्ध कंपनीला सोलार पार्क उभा करून दिला त्या ठिकाणी हजारावर रोजगारांची निर्मिती ही झाली आणि 80 मेगावाट 21 निर्मिती केली जात आहे. 2006-7 सालापासून न्यायालयीन लढा देऊन इंडिया सिमेंट फॅक्टरी परळीत उभी केली, पुढे अल्ट्राटेक कंपनी सुद्धा आता परळीत 600 कोटींची गुंतवणूक करण्यास मान्य झाले असून तसा करारही करण्यात आला आहे. मात्र हे सगळे आपल्या विरोधकांना दिसणार नाही. फक्त परळीची आणि परळीच्या मातीची बदनामी करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे. त्यांना आता आपण सर्व परळीकरांनी मिळून धडा शिकवला पाहिजे, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
*…तर माझ्या जागेत मेडिकल कॉलेज व दवाखाना उभारून देतो*
माझ्या घराजवळ 16 एकर जागा शिल्लक आहे त्यापैकी 15 एकर जागा देतो कोणीही वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीने पुढे यावे त्यांना ट्रस्ट तयार करून त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज व सर्व अध्ययवत वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय सुरू करून देतो. त्यासाठी लागणारे अर्थसहाय्यही कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देतो. मला त्यातून एक रुपयाच्या कमाईची अपेक्षा नाही अट फक्त एकच आहे की त्या रुग्णालयात परळी मतदारसंघातील गोरगरिबांची मोफत उपचारांची सुविधा झाली पाहिजे तसेच मेडिकल कॉलेजमध्ये मतदारसंघातील पात्र विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरात प्रवेश मिळाला पाहिजे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
या स्नेह मेळाव्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, प्रा. मधुकर आघाव, माऊली तात्या गडदे, जयपाल लाहोटी, मनीष झंवर, सतीश करमाळकर, सुशील डुबे, गोल्डीशेठ भाटिया, जगदीश चौधरी, अंबादास सुगावे, तसेच माऊली दादा फड, विजय सामत, शांतीलाल जैन, संदीप लाहोटी, बंडूशेठ गरुड, देवसटवार काका, विनोद शेठ सामत, नंदकिशोर विभा, सुभाष शेठ तोतला, पांडुरंग लाहोटी, गुलाबराव शेटे, विजय वाकेकर, अशोक कांकरिया, अनिल तांदळे, रतन कोठारी, राजगोपाल बंग, केदार सारडा, संजय दरक, सुनील कोटेचा, नवरतन शर्मा, लक्ष्मण मुंडे यांसह परळी शहर व तालुक्यातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.