बीड विधानसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील ठरविणार आमदार, नारायण गडाचे घेतले आशिर्वाद
बीड: बीड विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे मोजक्याच कुटूंबांची सत्ता असून प्रस्तापितांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आदेशानूसार बळीराम गवते यांनी सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी साध्या पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नारायण गड येथे जावून आशिर्वाद घेतले.
बीड मतदारसंघात अनेक वर्षांपासून काही मोजक्याच घराण्यांची सत्ता असून याच घराण्यांनी मतदारसंघ विकासापासून दूर ठेवलेला आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा विषय सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. उलट आरक्षणात खोडा घालण्याचे पाप येथील प्रस्तापितांनी केलेले आहे. दरम्यान, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश जरांगे पाटील यांनी दिलेले आहेत. या आदेशाप्रमाणे बळीराम गवते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बळीराम गवते यांचे पिताश्री बबनराव गवते हे ३५ वर्षांपासून प्रस्तापितांविरूध्द लढत आहेत. त्यांनी विस्तापितांची मोट बांधून जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये प्रस्तापितांची सत्ता काढून घेतलेली होती. बीड मतदारसंघात गवते पिता-पुत्रांचा मोठा जनसंग्रह असून बळीराम गवते हे धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गडाचे विश्वस्त आहेत. शिवाय त्यांचा मतदारसंघात मोठा मित्र परिवार सोबतीला आहे. नारायण गड येथे झालेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी त्यांनी केलेली धावपळ लाखो भाविक भक्तांनी पाहिलेली आहे. समाजाप्रती असलेली तळमळही त्यांनी कायम आपल्या कामातून दाखवून दिलेली आहेग़वते यांच्या उमेदवारी प्रस्तापितांसाठी आव्हान ठरणार आहे.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ३० तारखेला पाटील जो आदेश देतील, त्याप्रमाणे पुढील दिशा असेल. परंतु या मतदारसंघातून पाटलांनी उमेदवारी दिली तर आपण मराठा समाजाच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते करू.
-बळीराम गवते, उमेदवार, बीड मतदारसंघ.