दीपमाळे जवळ संस्कार भारतीचा नेत्रदीपक दीपोत्सव संपन्न
बीड प्रतिनिधी – देशातील विविध कला महाराष्ट्राने स्वीकारून आपले कलाक्षेत्रही विस्तारले, रसिकांनीही या स्वतंत्र वैशिष्ट्ये असणार्या कलांना जनाश्रय दिला असे मत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
येथील खंडोबा मंदिर दीपमाळेच्या परिसरात संस्कार भारती बीडचा दीपोत्सव संपन्न झाला. यावेळी विविध गायन वादन स्पर्धेत बक्षिसे जिंकलेल्या कलावंतांची सुरेख मैफल संपन्न झाली. प्रतिवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त संस्कार भारती बीडच्या वतीने येथील ऐतिहासिक दीपमाळ परिसर शेकडो पणत्या, आकर्षक रंगानी आणि ताल सुरात नाहून निघाला. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संगीत शिक्षक आणि विविध स्पर्धात बक्षीस मिळवलेल्या कलावंताचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याच कलावंतानी नंतर दोन तास विविध गाणी गाऊन मैफल संपन्न केली. ऐकल तबला वादन, बासरी वादन आणि भरतनाट्यम शैलीतील नृत्य या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, व्यासपीठावर संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भरत लोळगे, प्रांत प्रचार प्रमुख महेश वाघमारे, संस्कार भारती बीडचे अध्यक्ष प्रमोद वझे हे उपस्थित होते. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी कलावंत आणि संगीत शिक्षकांचे कौतुक केले, भारतीय संस्कृतीत कला क्षेत्राचे विशेष योगदान असून महाराष्ट्राने उत्तर भारत, दक्षिण भारतातील कला प्रकारही आपली पारंपरिक कला, लोककला जपत आत्मसात केल्याचे ते म्हणाले, विविध नामवंत कालावंतांचाही उल्लेख करीत त्यांनी गौरव केला, नव्या माध्यमांनीही कला आणि कलावंताना प्रोत्साहन मिळाले. धकाधकीच्या जीवनात संगीत, नाटक, चित्रपट हेच विरंगुळा देऊ शकतात असे सांगत बीड संस्कार भारतीच्या कनकालेश्वर महोत्सवाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.