सात वर्षांनंतर मिळाला न्याय…
बीड : येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. यावलकर यांनी आज ता. २४ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगरसेवक विनोद मुळूक, अॅड. महेश धांडे, अॅड सचिन काळे या सर्वांची पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2017 मध्ये परळी, ता. परळी, जि.बीड येथील एका समाजकंटकाने महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक पोस्ट व ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती, त्याचा निषेध करण्यासाठी बीड शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बीड शहर बंदची हाक दिली होती. सदर बंद दरम्यान, बीड शहरातील शांतता भंग करण्यात आली होती. सदर वेळी जिल्हा अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तात होते. बंदच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यास कर्तव्यावर असताना त्याचे शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यास मारहाण करण्यात आली होती, अशा आरोपाची तक्रार पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड येथे कुंडलिक खांडे, विनोद मुळूक, अॅड. महेश धांडे, अॅड. सचिन काळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती.
सदर प्रकरण 7 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात निकाली निघून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणात वरील समाजसेवकांना विनाकारण गोवण्यात आले होते या सर्वांच्या वतीने अॅड. मंगेश पोकळे यांनी काम पाहिले असुन त्यांना अॅड. अमोल नाटकर, अॅड. दीपक गायकवाड, अॅड. कौस्तुभ औटे, अॅड. कृष्णा आवारे, अॅड. विकास तौर आदींनी सहकार्य केले. यावेळी कुंडलिक खांडे, विनोद मुळूक, अॅड. महेश धांडे, अॅड. सचिन काळे यांनी अॅड. मंगेश पोकळे व त्यांचे सहकारी यांचे आभार व्यक्त केले.