– जनतेनी स्वतःची काळजी घ्यावी
– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पंचवीस हजार दोनशे कोरोणा रुग्ण सापडले असून त्यापैकी बावीस हजार दोनशे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल तीन हजार एकशे ब्यांनाव रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जनतेने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून स्वतःचे रक्षण स्वतःच करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
गेल्या वर्षी कोरोना सुरू झाल्यानंतर देशभरात लॉक डाऊन झाले. त्यावेळी बीड जिल्ह्यात निघालेल्या पेशंट पैकी सात/आठ पेशंट आम्ही पुण्याला पाठविण्यासाठी पुढाकार घेतला आणि पाठवले. तेव्हापासून कोरोना रुग्ण, दवाखाना यांचे बरोबरच जिल्हा प्रशासनाच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.
यातून बरीच रुग्ण सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. ही बाब दुर्दैवी असली तरी देखील आम्ही नोंदवलेला सहभाग हा समाजाने पाहिलेला आहे. लोक घाबरून आणि लॉक डाऊन मुळे घरात बसलेले असताना त्यावेळी आम्ही रस्त्यावर होतो. दवाखान्यात जेवण, पाणी, उपचार, गर्दी, नियमांचे उल्लंघन असे अनेक मुद्दे उपस्थित झाले की, आम्ही लक्ष घातले.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कोरोना रुग्ण अत्यंत जवळून पाहिले आहेत. दवाखान्याशी सातत्याने आमचा संपर्क आहे. दवाखान्यात ऍडमिट असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आमच्याशी नेहमी संपर्कात आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांची काय परिस्थिती होते, हे आम्ही जवळून पाहिले आहे.
त्यामुळे जनतेने स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळणे देखील आवश्यक असून आदेश न पाळल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाज विघातक कृत्य होत असल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत पंचवीस हजार दोनशे रुग्ण सापडले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण बीड तालुक्यामध्ये सापडले आहेत. रुग्णांची तालुका निहाय संख्या पाहता अंबाजोगाई – ३८५५, आष्टी – २४४०, बीड – ७९६३, धारूर – १००५, गेवराई – १३९९, केज – १६१०, माजलगाव – १९१३, परळी – २५९२, पाटोदा – ८१७, शिरूर – ८६२, तर सर्वात कमी रुग्ण वडवणी तालुक्याचा पडले असून तेथे ७२३ रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची तालुका निहाय आकडेवारी पाहताना अंबाजोगाई – ११४, आष्टी – ५१, बीड – १६३, धारूर – ३१, गेवराई – ४४, केज – ५९, माजलगाव – ४५, परळी – ६७, पाटोदा – २५, शिरूर कासार – १६ आणि वडवणी – ११ याप्रमाणे रुग्ण कोरोणामुळे दगावली आहेत. ही सर्व आकडेवारी अधिकृत असून दि. ३० मार्च २०२१ पर्यंतची आहे.
जिल्ह्यातील ही आकडेवारी पाहता जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाची दक्षता घेऊन नियमांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉक डाऊनचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर जनजीवन विस्कळीत होणार असून यामुळे समाजाला पुन्हा अडचणीला तोंड द्यावे लागेल. कोरोनाचे हे संकट आणखी वर्षभर तरी चालेल, असे दिसते. त्यामुळे जनतेने आपापल्या पातळीवर दक्षता घेऊन कोरुना पासून दूर रहावे, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
———-
चौकट
———
* जिल्ह्यात एका वर्षात २५,१७९ रुग्णांना झाला कोरोना
* जिल्ह्यात आज उपचार घेत असलेले रुग्ण २६४३
* जिल्ह्यात कोरोनाचे वर्षात ६२६ रुग्णांचा झाला मृत्यू
* मास्क आणि सॅनिटायझर वापरून करा संरक्षण
* जिल्हा प्रशासनाचे नियम पाळून करा सहकार्य
——–