बीड : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल , आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे वाचन करावे, महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचेही वाचन करावे, महाविद्यालयीन वेळ संपल्यानंतर आपला वेळ अभ्यासासाठी, खेळण्यासाठी, कुंटुंबासाठी कसा देता येईल याची दैनदिनी अखावी. आजचे विद्यार्थी, विद्यार्थीनी ही उद्याची सक्षम पिढी घडवू शकतात. सामाजिक, कौटुंबिक आणि स्वत:चे भविष्य घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता अभ्यासाचे नियोजन करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी केले
महसूल व वन विभाग अंतर्गत तहसील कार्यालय बीड आयोजित महसूल सप्ताहानिमित्त के. एस. के महाविद्यालयात युवासंवाद या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उदबोधन करतांना त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांनी कुणावरही आवलंबून न राहता स्वत:च्या आवडीचे छंद जोपासावेत तसेच त्यांनी खाजगी किंवा शासकीय सेवेत निवड होण्यासाठी जिद्द, चिकाटी, अभ्यासाचे सातत्य आणि प्रमाणिकपणा ठेवला तर विद्यार्थी कोणत्याही कठीण परिक्षेला सामोरे जाऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक मुला मुलीने सक्षमपणे व कुंटुंबातील व्यक्तीनां विश्वासात घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. शासकीय सेवेत एका जागेसाठी लाखोंनी अर्ज आलेले असतात तेव्हा ही स्पर्धा पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही, त्यासाठी 10 ते 11 तास अभ्यासाला देणे गरजेचे असून आपल्याला नेमके कोणते क्षेत्र निवडायचे त्या दिशेने विद्यार्थ्यांनी पाऊल टाकले तर यशाचे शिखर गाठणे कठीण नाही, असेही जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी यावेळी सांगितले.
महसुल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थी, विद्यार्थीनीनां विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास के.एस.के महाविद्यालयाच्या सचिव दिपा क्षीरसागर, तहसीलदार सुरेंद्र डोके, तहसीलदार नरेद्र कुलकर्णी,तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, के. एस. के महाविद्यालयाचे उप प्राचार्य संजय पाटील देवळाणकर महाविद्यालयातील प्राध्यापक, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शनात तहसीलदार सुरेंद्र डोके म्हणाले की, 1 ते 7 ऑगस्ट 2023 या महसूल सप्ताहानिमित्त दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी के. एस. के. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत महसुल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमातंर्गत महाविद्यालयात ई सेवा केंद्रामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत अशा सूचना विद्यार्थ्यांना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी महाविद्यालयाच्या सचिव दिपा क्षीरसागर यांच्याशी महाविद्यालयातील सोई सुविधा विषयी माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी ग्रंथ भेट देऊन ग्रंथालयाविषयी आणि विद्यार्थ्यांना करिअर संबधी मार्गदर्शनासाठी वेगळा विभाग, नाटयशास्त्र विभाग असल्याची माहिती दिली.