पोलीस वेळीच दाखल झाल्याने जीवितहानी टळली
पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली
35 जणांविरोधात शिवाजीनगर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
आसाराम गायकवाड यांना केली अटक
चार जखमींवर उपचार सुरू
दुपारनंतर बीडमध्ये आयजी होणार दाखल
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड शहरात काल साडेदहाच्या सुमारास शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरात दोन गट आमने-सामने आल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर काही वेळातच पोलीस त्याठिकाणी पोहोचल्यामुळे होणारी जिवितहानी टळल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गट आक्रमक असल्यामुळे पोलीसांना याठिकाणी काही प्रमाणात बळाचा वापर करून जमाव पांगवण्यात यश आले. यावेळी पोलीसांसमोर याठिकाणी फायर केला. यात दोघांच्या पायांना इजा झाली होती, याप्रकरणाची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव जात परिस्थितीच्या अनुषंगाने तात्काळ पाऊले उचलली. यामुळे मोठा वाद टळला. यासह अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, शहर पोलीस निरीक्षक शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक या तिघांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती आटोक्यात आणली.
जुन्या भांडणाची कुरापत काढत बीड शहरातील दोन गट आमने-सामने आले होते. या गटाकडे तलवार, लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड, पिस्टल सोबत असल्यामुळे हा वाद मोठ्या स्वरूपात होणार होता परंतु वेळीच याबाबतची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर काही वेळातच पोलीस बीड शहरातील चऱ्हाटा परिसरात दाखल झाले. यावेळी त्याठिकाणी दोन्ही गट आक्रमक होते परंतु पोलीस फाटा गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री साडेदहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. यामध्ये चार जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शस्त्रक्रिया करून एकाच्या पायातील गोळी काढण्यात आली. जिल्हा रुग्णालयात पोलीस अधीक्षक स्वत: उपस्थित राहून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत होते. या घटनेत पोलीसांनी स्वत: फिर्याद देत 35 जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. यामध्ये आसाराम गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे नोंद केलेल्यांमध्ये आसाराम जगन्नाथ गायकवाड, विपुल आसाराम गायकवाड, अमर आसाराम गायकवाड, ऋषी आसाराम गायकवाड, मारोती जगन्नाथ गायकवाड, संभा मारूती गायकवाड, बल्ल्या मारोती गायकवाड, निखिल सपकाळ, संतोष सुरेश जाधव, निलेश सुरेश जाधव, सुरेश रामलाल जाधव, प्रदीप विष्णू गायकवाड, दिपक विष्णू गायकवाड, विष्णू रामभाऊ गायकवाड, अशोक गायकवाड, परसराम गौतम गायकवाड, प्रविण गौतम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जाधव, सुमित कोळपे व इतर 15 ते 20 अनोळखींवर कलम 160, 307, 323, 324, 506, 147, 148, 149 भादंविसह 3/25, 4/25 सह कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या तत्परतेमुळे पोलीस यंत्रणा वेळेत कामाला
काल अचानक चऱ्हाटा फाटा परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून आसाराम गायकवाड व सुभाष जाधव हे दोन गट चऱ्हाटा फाटा परिसरात आमनेसामने आले होते. या दोन्ही गटाकडे धारदार शस्त्र असल्यामुळे मोठा वाद होणार हे निश्चित होते परंतु याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस यंत्रणा हलवत हे प्रकरण वेळीच आटोक्यात आणले. यासह जिल्हा रुग्णालयात सुद्धा जखमींना आणल्यानंतर मोठा जमाव झाला होता. यावेळी सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी स्वत: उपस्थित राहून जमावावर नियंत्रण मिळवले.
आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथकाची तरतूद
जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व त्यांची टिम दिवसरात्र काम करत आहे. परंतु काल शहरात झालेल्या गोळीबारानंतर परत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हे दोन गट आमने-सामने आल्यानंतर जे चार जण जखमी झाले, यानंतर सुद्धा दोन्ही गटाकडून फिर्यादसुद्धा देण्यात आली नव्हती परंतु यामध्ये पोलीसांनी स्वत: फिर्याद देत 35 जणांवर गुन्हे नोंद करत काही जणांना ताब्यात घेवून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या स्वत: फिर्यादी व्हायच्या फॉर्म्यूलामुळे गोंधळ घालणाऱ्याला बसू लागला चाप
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात किरकोळ कारणावरून दोन गट विविध ठिकाणी अनेकवेळा आमनेसामने आलेले आहेत परंतु मोठा वाद होऊन सुद्धा यामध्येदोन्ही गटाकडून साधी फिर्याद सुद्धा देण्यात येत नव्हती. यामुळे जे वाद घालतात त्यांचे काहीच होत नव्हते, परंतु पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एखाद्या ठिकाणी घटना घडली तर त्या घटनेची सखोल चौकशी करून स्वत:च फिर्यादी होवून दोन्ही गटावर गुन्हे नोंद करायचे व गोंधळ घालणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करायची, या फॉर्म्युलामुळे जिल्ह्यातील कायदा व्यवस्था बिघडविणाऱ्यांना मात्र चांगला चोप बसत आहे.
गोळीबारात लागलेल्या एकाच्या पायातील गोळी काढली
बीड शहरात काल झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. यामध्ये एकाच्या पायाला गोळी चाटून गेली होती तर एकाच्या पायात गोळी गेली होती, आज सकाळी गोपाळ परमेश्वर भिसे (वय 19) याच्या पायावरील शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रविण देशमुख यांनी पायातील गोळी काढली.
दुपारनंतर आयजी बीडमध्ये येणार
बीड शहरात झालेल्या गोळीबारानंतर तात्काळ संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला होता. याच अनुषंगाने आज आय.जी.दुपारनंतर बीडमध्ये येत असून बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.