मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याच्या होमिओपॅथीक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा केंद्रीय होमिओपॅथीक परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.अरूण भस्मे यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
होमिओपॅथीचा विकास व संशोधन आणि होमिओपॅथीचे शिक्षण या मध्ये आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाला सल्ला देण्यासाठी शासनाने डॉ.अरूण भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती पुर्नगठीत केली आहे. या समितीमध्ये डॉ.परिनाझ हुमरानवाला मुंबई सदस्य, डॉ.मनोज रांका पुणे सदस्य, डॉ.प्रमोदीनी पागे मुंबई सदस्य, डॉ.तजनीन बिडीवाले सांगली सदस्य, डॉ.फारूक मोतीवाला नाशिक सदस्य, डॉ.मनिष पाटील नागपुर सदस्य यांची ही सदस्य म्हणुन नियुक्ती झाली आहे.
22 वर्षापुर्वी शासनाने अशी सल्लागार समिती गठीत केली होती. शासन निर्णय क्रमांक : महोप-0622/प्र.क्र.41/अधिनियम या नवीन आदेशान्वये शासनाने या समितीचे पुर्नगठन केले आहे. राज्यात होमिओपॅथीचा विकास व संशोधन आणि होमिओपॅथीक शिक्षण या संदर्भात शासनाला सल्ला देणे तसेच शासन या समितीकडे जे विषय अभ्यासपुर्ण अहवाल देण्याकरीता सोपविल त्याबाबत शासनास अहवाल सादर करणे अशी समितीची कार्यकक्षा आहे.
डॉ.भस्मे हे बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाचे सलग 43 वर्ष प्राचार्य होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर होमिओपॅथी विद्याशाखा अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, परिक्षा मंडळ या विविध प्राधिकरणावर काम केले आहे. केंद्रीय होमिओपॅथीक परिषदेमध्ये 1991 पासुन सदस्य, शिक्षण समिती सदस्य, कार्यकारीणी समिती सदस्य तथा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणुन 2018 पर्यंत काम केले. त्यांच्या या अनुभवाच्या आधारावर शासनाने डॉ.भस्मे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल डॉ.अरूण भस्मे यांनी शासनाचे आभार मानले. या नियुक्तीबद्दल डॉ.अरूण भस्मे यांचे होमिओपॅथीक क्षेत्रात अभिनंदन होत आहे.