मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडेंसह 31 जणांवर पिंपळनेर पोलीसात गुन्हा नोंद
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड तालुक्यातील म्हाळसजवळा याठिकाणी काल झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये अखेर पोलीसांनी एंट्री करत या प्रकरणात दोन्ही गटांवर गुन्हे नोंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. म्हाळसजवळा याठिकाणी राजकीय वादातून नेहमीच वाद होत असतात. यापूर्वी सुद्धा म्हाळसजवळा याठिकाणी दोन्ही गटात वाद झाले होते परंतु राजकीय शक्ती वापरून मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी हे प्रकरण दाबले होते परंतु यावेळेस मात्र उलटे झाले, चक्क पोलीसांनीच फिर्यादी होत दोन्ही गटावर म्हणजे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडेसह 31 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. यामुळे म्हाळसजवळासह इतर ठिकाणी खांडेंच्या चाललेल्या दादागिरीला खऱ्या अर्थाने चाप बसणार आहे. मुख्यमंत्री साहेब सरकार सर्वसामान्यांसाठी म्हणता आणि दुसरीकडे तुमचेच जिल्हाध्यक्ष धारदार शस्त्र हातात घेवून गावातील शांतता भंग करतात, हे तुमच्या सांगण्यावरून होतंय का? तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षांवर काही कारवाई करणार आहात का? किंवा त्यांना योग्य त्या सुचना करणार आहात का? यासह इतर प्रश्न बीड जिल्ह्यात उपस्थित होत आहेत.
कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादग्रस्त असलेले कुंडलिक खांडे यांच्या गटात व समोरच्या गटामध्ये सोमवारी मध्यरात्री म्हाळसजवळा याठिकाणी राडा झाला, यावेळी हातात शस्त्र घेवून दोन्ही गट समोरासमोर भिडले होते. या प्रकरणाचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. या प्रकरणात दोन्ही गटाकडून पोलीसांना फिर्याद देण्यात आली नव्हती यामुळे गुन्हा नोंद होण्यास विलंब होत होता परंतु या घटनेची शहानिशा करून यामध्ये पोलीस प्रशासनानेच एंट्री करत दोन्ही गटात गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, गणेश खांडे, बाळासाहेब खांडे, पप्पू शिंदे, ज्ञानेश्वर खांडे, सुशिल खांडे, संदिप खांडे, भागवत खांडे यांच्यासह 31 जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 160, 143, 149, यासह इतर कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलीसांच्या या भूमिकेवरून जिल्ह्यात शांतता भंग करणाऱ्यांना सुट्टी नाही असा इशाराच पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. बीड जिल्हा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत असतो, यामध्ये भर पडते ते मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीने. म्हाळसजवळा याठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कुंडलिक खांडे यांचा पॅनल निवडूण आल्यानंतर दोन्ही गटामध्ये वारंवार धुसफुस सुरूच होती. अखेर याचे रूपांतर काल भांडणात झाले. दोन्ही गट एकमेकाविरोधात गुन्हे नोंद करण्यास तयार नसल्याचे दिसत नव्हते परंतु यात पोलीसांनी फिर्यादी होवून एंट्री केल्याने या दादागिरीला चाप बसणार हे मात्र नक्की.
कुंडलिक खांडेंची दादागिरी का सहन करायची, पोलीस प्रशासनाने केले ते योग्यच केले!
मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे हे सत्तेचा दुरुपयोग करत असल्याच्या अनेक घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत, त्या सुद्धा सर्वांनी पाहिल्या आहेत. यामध्ये गुटखा प्रकरण, मारहाण प्रकरण त्यात भर पडली ती काल म्हाळसजवळा येथील मारहाण प्रकरण. सोमवारी मध्यरात्री म्हाळसजवळा याठिकाणी दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी मोठा वाद झाला. विशेष म्हणजे यावेळी धारदार शस्त्रांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. या घटनेवरून लक्षात येते की, गावची शांतता कशाप्रकारे भंग होत आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष यांची दादागिरी सर्वसामान्यांनी का सहन करायची हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका ही योग्यच असून त्या भूमिकेचं सर्वसामान्यातून स्वागतच होत आहे.