बीड । प्रतिनिधी : मिंधे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, मात्र अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या घोषणा फसव्या आहेत. आम्ही आठ दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत. आठ दिवसाच्या आत वीज कनेक्शन तोडणी थांबवून तोडलेले कनेक्शन न जोडल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, अधिकार्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये दिला.
संकटात सापडलेल्या शेतकर्यांना खिंडीत पकडण्याचे काम सरकार करत आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. त्यातच वीज बिलासाठी सरकर तगादा लावत आहे. शेतकर्यांचे वीज कनेक्शन बिलाअभावी तोडले जात आहे. विहिरीत पाणी आहे मात्र लाईट नाही अशी परिस्थिती गावागावात निर्माण झाली आहे. पीक विमा कंपन्यांच्या दादागिरीमध्ये वाढ झाली आहे. विमा कंपन्या शेतकर्यांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यांची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी संतप्त शिवसैनिकांनी बीड जिल्ह्यात आंदोलन पुकारले.
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संतप्त शिवसैनिक आणि शेतकर्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले की, आमच्या रस्ता रोको आंदोलनामुळे सामान्य जनतेला आज त्रास होत आहे. जनतेला त्रास द्यायचा नाही मात्र शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. शेतकरी संकटात आहे. शेतकर्यांना धीर देण्याऐवजी त्यांना खिंडीत पकडले जात आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. वीज तोडणी करू नका ती तात्काळ थांबवा आणि तोडलेली वीज तातडीने जोडा या मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. अंमलबजावणी केली जात नाही. अंमलबजावणी कशी करायची असते ते शिवसेना दाखवून देईल. आठ दिवसांच्या आत वीज वितरण कंपनी आणि पीक विमा कंपन्यांची नौटंकी न थांबल्यास शिवसेना आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल आणि अधिकार्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक बाबासाहेब घुगे, शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, शिवसेना शहर प्रमुख बीड सुनिल सुरवसे, शिवसेना उपशहर प्रमुख हनुमानप्रसाद पांडे, आकाश जगताप, निखिल चौरे, ऋषी जगताप, गौरव वायबट, अनिकेत नाटकर, नामदेव म्हेत्रे, जयकिशन पांडे, कृष्णा सुर्वे व सर्व शेतकरी बांधव व शिवसैनिक उपस्थित होते.