बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशभरात गायरानधारकांच्या न्यायीक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलने होत असून त्याच अनुषंगाने आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान धारक सहभागी झाले होते.
दलित, भूमिहिन, आदिवासी, पारधी, गाव कुणसा बाहेरील उपेक्षित भूमिहिन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या विरोधात आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या या निर्णयाचा निषेध करून सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च एकदा विचार करून गायरानधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजू जोगदंड, किशन तांगडे, मजहर खान, गोवर्धन वाघमारे, किशोर कांडेकर, दिपक कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.