(संग्रहित फोटो)
बीड : उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, सोन्नाखोटा, ता. वडवणी या प्रकल्पात दि. 28 जुलै रोजी एकूण 16.40 दशलक्षघनमीटर म्हणजेच 84.72 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. सांडव्याद्वारे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अपेक्षित पाणीपातळी पर्यंत पोहोचल्यावर जलसंपदा विभागाच्या यंत्रणेमार्फत कु़ंडलिका नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा धरणाच्या उर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकच्या अनुषंगाने ठरवण्यात येईल. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता भासू शकते.
या पार्श्वभूमिवर वडवणी आणि धारूर तालुक्यातील नदीपात्रास लागून असलेल्या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील जनतेने नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी व इतर तत्सम साहित्य इ. तात्काळ काढून घेण्याबाबत, तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. याबाबत संबंधित गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आला आहे.