गोरगरिबांच्या पैसाची कशी वाट लावायची हे नगर पालिकेकडून शिकावे!
माजी मार्केटसाठी बनवलेल्या इमारतीचा मुतारीसाठी होतोय वापर
नगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराची राज्यभर चर्चा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या काही महिन्यांमध्ये एक प्रश्न सारखा पुढे येतोय तो म्हणजे बीड नगरपालिकेने तयार सिद्धीविनायक काँप्लेक्स परिसरातील उभारलेली एक इमारत. मुळात ही इमारत भाजी मार्केटसाठी बनवण्यात आलेली होती. यासाठी नगर पालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. ही इमारत पुर्ण होऊन जवळ-पास चार तर पाच वर्ष झाले तरी या इमारतीचा वापर भाजी मार्केटसाठी झालेला नाही. गोरगरिबांच्या कोट्यवधी रुपयांची उधळ करुन बांधलेली इमारत आज मुतारीसाठी वापरली जात आहे. या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवून सुद्धा याकडे नगर पालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या पैसाची कशी वाट लावायची हे बीड नगर पालिकेकडून शिकावे. सध्या ही इमारत सोशल मिडियावर चांगलीच गाजत असून नगर पालिकेने केलेल्या अनागोंदी कारभाराची राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.
बीड शहरात नगरपालिका फक्त नावालाच नावारुपाला आली आहे. गेले 30 ते 35 वर्षापासून बीड नगरपालिकेवर क्षीरसागर यांची सत्ता असून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्रीच आहे का? बीड शहरातील नाल्या, बीड शहरातील रस्ते आणि बीड शहरातील स्वच्छ बीड सुंदर बीड या सगळ्या गोष्टी कागदोपत्रीच का अशा प्रश्न आता नागरीक विचारत आहेत. एक तर शहरात विकासकामे करायचीच नाहीत केली तरी फक्त निवडणूकीच्या तोंडावर थोड्याफार प्रमाणात करायची. दर्जेदार कामांसाठी विशेष लक्ष द्यायचे नाही. यामुळे विकासकामांसाठी आलेला निधी योग्य मार्गाला लागत नाहीत. बीड शहरातील सिद्धीविनायक काँप्लेक्स परिसरात नगरपालिकेने भाजी मार्केटसाठी एक इमारत उभारली असून ही इमारत उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. खर्च होईना का? पण ती इमारत सर्वसामान्यांच्या वापरत तरी यायला हवी होती. जेव्हापासून ही इमारत निर्माण झाली आहे तेव्हापासून आज पर्यंत या इमारतीचा सर्वसामान्यांना काय फायदा झाला याचे उत्तर नगर पालिकेने देणं गरजेचे आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी आलेला पैसा तुम्ही तुमची मनमानी करत वाया घालवता हे कुठ पर्यंत चालणार? ही इमारत बांधण्याची खरंच गरज होती का? यासाठी कोणी पुढाकार घेतला, सध्या ही इमारत का वापरात आणली जात नाही यासह इतर प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
कोट्यवधी खर्च केलेल्या इमारतीचा मुतारीसाठी वापर
नगर पालिकेचा कारभार कसा प्रकारे चालतो हे यावरुन लक्षात येईलच. ज्याठिकाणी खर्च करायची गरज आहे. त्याठिकाणी नगर पालिका खर्च करत नाही व ज्याठिकाणी खर्च करण्याची गरज नाही त्याठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. यामुळे आज सुद्धा बीड शहरात अनेक समस्यांचा सामना बीडकरांना करावा लागतो. चक्क कोट्यवधीची इमारत मुतारीसाठी वापरण्यात येत आहे. एवढी भव्यदिव्य इमारत इतर कामांसाठी वापरता येऊ शकते. परंतू तशी मानसीकता सत्ताधाऱ्यांची दिसत नाही. यामुळे भविष्यात तरी बीडकरांनी योग्य पर्याय निवडण्याची गरज आहे.