सात नगरपालिकांमधील सत्ता गमावली, काँग्रेसला लॉटरी
भोपाळ : मध्य प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 16 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना 7 नगरपालिकांमधील सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या 16 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपचे 9, काँग्रेसचे 5 आणि आम आदमी पार्टीला एक आणि अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. काँग्रेसच्या ताब्यात या 16 नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका नव्हती. मात्र, थेट नगराध्यक्षपद निवडणूक पद्धतीचा फायदा भाजपला होण्याऐवजी काँग्रेसला झाला आहे. यामध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं घेतलेला एक निर्णय देखील कारणीभूत आहे. भाजपनं काँग्रेसच्या कमलनाथ यांच्या काळातील नगरपालिकांमधी नगराध्यक्ष निवडणुकीची पद्धत बदलली त्यामुळं हे घडलं. जर, कमलनाथ यांचा निर्णय बदलला नसता तर भाजपे 16 नगरपालिकांपैकी 15 ठिकाणी नगराध्यक्ष बनले असते.
कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार मध्यप्रदेशात असताना महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीनंतर महापौर आणि नगराध्यक्ष यांची निवड नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपनं त्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. कमलनाथ यांचा निर्णय लोकशाहीची हत्या करणार असल्याचं महटलं होतं. 2020 मध्ये शिवराजसिंह यांचं सरकार आल्यानंतर कमलनाथ यांचा निर्णय रद्द करण्यात आला होता. कमलनाथ यांच्या सरकारचा निर्णय कायम ठेवला असता तर भाजपचे 16 पैकी 15 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आले असते. 16 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.