15 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला देशाला मिळालेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती
नवी दिल्ली : आज देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात मतगणना सुरु होईल. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या विजयी झाल्या तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल
18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संसद भवनात मतमोजणी होणार आहे. खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी होणार आहे. त्याच कक्षात मतदानही झाले. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. 8 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील. सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.