प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई प्रतिनिधी : अखेर गुणरत्न सदावर्ते यांची आज (ता. 26) 18 दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली. बाहेर येताच सदावर्तेंनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्राच्या सरकारला आदरपूर्वक सांगतो. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी विनंती करतो की माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी. ते घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी.”