नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी राजकीय व्यासपीठावरील पहिल्याच भाषणात जिंकली सर्वांची मने !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी… परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत परळीत आज ना पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला. तसेच प्रत्यक्ष जाहीर प्रचाराचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रचंड जाहीर सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी राजकीय व्यासपीठावरील पहिलेच भाषण केले. पहिल्याच भाषणात त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांसह सर्वच उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या भाषणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी त्यांनी ‘मी उतणार नाही,मातणार नाही, परळीच्या जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही असा एकच शब्द देते असे म्हणत अश्वासक विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्रपक्ष महायुतीच्या जाहीर प्रचार शुभारंभ व महायुतीचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी अगदी मुद्देसूद,संयमित व परळीच्या विकासात्मक वाटचाल याची गुंफन करत भाषण केल्याचे दिसून आले. त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले की,या नगरपरिषद निवडणुकीत, नगराध्यक्ष पदासाठी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभी आहे. व्यासपीठावर एवढे दिग्गज नेते उपस्थित आहेत. एवढ्या मोठ्या राजकीय व्यासपीठावर आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर प्रथमच आपण भाषणासाठी उभे असल्याचे सांगत राज्याचे दोन दमदार नेतृत्व, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे व माजीमंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे,महायुतीचे सर्व नेतेगण यांनी माझ्यावर नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून विश्वासाने जबाबदारी टाकली आहे. परळीकर मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळवून हा विश्वास आपण सार्थ करुन दाखवू अशी ग्वाही दिली.
पुढे बोलतांना सौ.पद्मश्रीताई यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर ही निवडणूक परळीच्या भविष्याची निवडणूक आहे. विकासीत शहराची दिशा ठरविण्याची ही निवडणूक आहे.आपलं शहर व शहरातील नागरी जीवन सुनियोजित, सुसह्य व समृद्ध कसे होईल हा दृष्टिकोन दृढ करण्याचा आपला प्रयत्न राहील.शहर विकासाची दृष्टी आणि दृष्टिकोन आपल्या महायुतीच्या दोन्ही दमदार नेतृत्वांकडेच आहे. त्यामुळे सुज्ञ परळीकर महायुतीला भरघोस मतांनी विजयी करुन नगर परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकवतील याचा खंबीर विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पहिल्याच भाषणात मी मोठमोठी अश्वासने आणि निवडणूकीपुरती डायलाॅगबाजी करणार नाही असे म्हणत मला एवढंच माहित आहे की, धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हेच खऱ्या अर्थाने परळीच्या विकासाचा ‘समृद्धी महामार्ग’ आहेत. परळीच्या विकासाचा प्रवास याच मार्गावरुन गती आणि प्रगतीने होवू शकेल.याची 100 टक्के ‘गॅरंटी’ माझ्यासह आपल्या सर्वांना आहे. परळीकर नागरीकांचा या नेतृत्वावर खंबीर विश्वास आहे, त्याचबरोबर माझे पती माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची कार्यपद्धी, एक कार्यकर्ता म्हणून निरंतर लोकांच्या कामातील त्यांचं समर्पण, परळीकरांच्या सुख दुखाची सहवेदना आणि परळीसाठीची प्रामाणिक तळमळ, माझ्यापेक्षाही तमाम परळीकरांना माहित आहे असे सांगून त्यांनी त्याच परंपरेतून, नव्या उत्साहाने आणि नव्या दृष्टिकोनाने परळीच्या विकासासाठी निरंतर प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परळीकरांना आवाहन करतांना त्यांनी सांगितले की,आज मी तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, आणि तुमचा आशिर्वाद मागायला आलेली आहे. विकासाची गती आणि परळीची प्रगती हा संकल्प घेऊन आलेली आहे. परळीकरांची सेवा,विकास व विश्वास हे अभिवचन देण्यासाठी आलेली आहे. पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या परळीचा जपुन वारसा – चौफेर आणि सर्वंकष विकासाचा घेऊन वसा मी आपल्याला आपले मतरुपी आशीर्वाद मागत आहे. परळीकर मायबाप जनता मला नगराध्यक्षपदाला व महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरभरून मते देवून विजयी करतील असा विश्वास व्यक्त करते. यासाठी एक आपली सुन म्हणून, लेक म्हणून, बहिण म्हणून आपण मला आशीर्वाद द्यावेत. आम्हास सेवेची संधी द्यावी.परळीच्या दोन्ही दमदार नेतृत्वाचे हात बळकट करावे. मी उतणार नाही,मातणार नाही, परळीच्या सेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही एवढा एकच शब्द देते असे म्हणत तमाम परळीकरांना पद्मश्रीताईंनी यावेळी विजयाची साद घातली.
















