खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा आज शहरात प्रचार दौरा; विविध प्रभागांत कॉर्नर बैठकांचे नियोजन
परळी प्रतिनिधी : परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि मित्रपक्ष आघाडीने प्रचाराची आक्रमक सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्याताई दिपकनाना देशमुख यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख नेते मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी परळीत प्रचार दौरा करणार आहेत. शहराच्या विविध भागांत प्रचार फेरी तर काही ठिकाणी महत्त्वपूर्ण कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात होणाऱ्या आजच्या प्रचार दौऱ्यात बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, राजेभाऊ फड (प्रदेश सरचिटणीस) आणि दीपक नाना देशमुख हे नेते विशेषतः सहभागी होणार असून, दिवसभर विविध प्रभागांमध्ये सभा आणि प्रचारफेऱ्यांद्वारे मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. सकाळी ९ वा. : प्रभाग ८ मधील प्रचार फेरी, सकाळी ११ वा. : प्रभाग ७ व ८ येथील संयुक्त सभा, सायं. ५ वा. : प्रभाग १ व ९ मधील प्रचार फेरी, सायं. ७ वा. : प्रभाग १ व ९ येथील संयुक्त सभा याप्रमाणे आजच्या प्रचार फेरी आणि कॉर्नर बैठकांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रचार समितीकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी) आणि मित्रपक्ष आघाडीतर्फे या दौऱ्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परळीच्या विकासाचा नवा रोडमॅप, लोककल्याणाचे आश्वासन आणि स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका या सभांमध्ये मांडली जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. परळी नगरपरिषद निवडणूक चुरशीची होत असून, आघाडीच्या या प्रचार दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
*निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पक्षपाती भूमिका!*
परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर हे कोणाच्यातरी दबावाखाली किंवा सांगण्यावरून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवारांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. तसेच, परळीतील इतर प्रशासन देखील, एकतर्फी पक्षपाती भूमिका घेत आहेत. याची रीतसर तक्रार राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांना व संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख व व दीपक रंगनाथ देशमुख यांनी केली आहे. यामुळे परळीत प्रशासनाच्या भूमिकेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक राजकारणात चर्चेला ऊत देणारी बाब म्हणजे गणेशपार येथील सभेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी नाकारली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर स्थानिक आमदार तसेच मंत्र्यांचा दबाव असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगत आहे. त्यामुळे प्रशासनाची निष्पक्षता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रत्यक्ष मतदान बुथवर काय परिस्थिती असेल याची यावरून कल्पना येते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तर परळीत लोकशाही टिकून राहील किंवा लोकशाहीत निवडणुका होतील.
















