घोडकेंचा उमेदवारी अर्ज मागे; प्रभाग क्र.२५ सह भाजपसोबत काम करण्याचा निर्धार
बीड प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज (दि.२१) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नवे राजकीय ‘समीकरण’ तयार होऊ लागले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विनोद मुळूक यांच्यावर त्यांच्या समर्थकाने आरोप केले आहेत. त्यांचे समर्थक बाळासाहेब घोडके यांनी पत्नीचा सर्वसाधारण महिला प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाकडून शेवटपर्यंत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून होते. परंतु तसे न होता विनोद मुळूक यांनी आपल्या नातेवाईकाला उमेदवारी देत आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप घोडके यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, दोन वर्षे माझ्या मागे लागून मला दिशाभूल करण्यात आली. मात्र अर्ज दाखल करण्याच्या निर्णायक क्षणी माझ्या जवळच्या नातेवाइकाला बी-फॉर्म देत मला मागे टाकण्यात आले. ही माझ्या विश्वासघाताची पराकाष्ठा आहे, असे घोडके यांनी सांगून नाराजी व्यक्त केली. यापुढे आपण भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचेही घोडके यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २५ मधील राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे दिसत असून दिवसाअखेरीस निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे शिराळे, पिंगळे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग क्रमांक २५ मधील अजिंक्य बाबुराव शिराळे, ज्योती नंदू पिंगळे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचार करून संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे.














