परळी वैजनाथ : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांच्या शिफारशीमुळे तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीला नवीन इमारत बांधकामसाठी २५ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला असुन निधी मिळाल्याबद्दल सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंञ इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंञ कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी शासनाकडून मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत निधी मंजुर करण्यात येत असतो. तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीला स्वतंञ इमारत असावी अशी ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांपासुनची मागणी होती. या संदर्भात सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ ना.पंकजाताई मुंडे यांना भेटले होते. त्याअनुषंगाने ना.पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंञी जयकुमार गोरे यांना एक पञ पाठवुन नागापूर ग्रामपंचायतीला इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करावा अशी शिफारस केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंञालयाने यासाठी २५ लाख रुपयाचा निधी मंजुर केला असुन त्याला प्रशासकीय मान्यता देखील प्रदान केली आहे. ग्रामपंचायतीला नवीन इमारत मंजुर करुन दिल्याबद्दल सरपंच, उपसपंच व ग्रामस्थांनी ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
















