धनंजय मुंडेंचे सोशल इंजिनिअरिंग आणि महायुती इफेक्ट ठरणार निर्णायक
परळी वैद्यनाथ प्रतिनिधी – परळी नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद निवडणुकीच्या विजयाचा श्रीगणेशा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा केशव बळवंत (प्रभाग १३- ब) व शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार जयश्री मुंडे – गित्ते (प्रभाग ११ – अ) या बिनविरोध नगरसेवक झाल्या आहेत.
राज्यात अत्यंत चर्चेत असलेल्या परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत मुंडे बंधू – भगिनी महायुती म्हणून एकत्रित लढत असल्याने त्यांचे बळ अधिक असून, निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच दोन जागा बिनविरोध विजयी झाल्याने मुंडेंचा गड अबाधित राहील, याचे संकेत स्पष्ट झाले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दरम्यान या निवडणुकीत पक्षीय गणितांसोबतच उमेदवारी देताना धनंजय मुंडे यांनी साधलेले सोशल इंजिनिअरिंग, त्याला मंत्री पंकजाताई मुंडे यांची साथ, शिवसेनेचे बळ या तीनही गोष्टी एकत्रित आल्याने महायुती इफेक्ट इथे निर्णायक ठरेल असे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीची गणिते बिघडल्याचे चित्र आहे, मात्र तरीही धनंजय मुंडे यांच्या पुढाकारामुळे परळी नगर परिषद निवडणुकीत महायुती एकत्र जागा लढवत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस २३ जागांवरती लढत असून, भाजप ८, शिवसेना २ तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनाही दोन जागा देण्यात आल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी महायुतीची घडी बसवून विजयाचा मार्क अधिक सुकर केला असल्याची चर्चा आहे.

















