जनसामान्यांची कामं अन् कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम रामटेक मधून होईल
मुंबई : राजकारण, समाजकारण करत असताना माझ्या संकटात आणि विजयात तुम्ही तेवढेच साक्षीदार आहात. तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे तुमच्यासाठी जे जे काही चांगलं असेल ते करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जन सामान्यांची कामं आणि सर्वाना बळ देण्याचं काम ‘रामटेक’ मधून होईल अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगूज साधलं.
बीड जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मुंबईतील “रामटेक” या शासकीय निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी एक छोटेखानी कौटुंबिक स्नेहमिलन कार्यक्रम काल आयोजित केला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. आई प्रज्ञाताई मुंडे यावेळी आवर्जून उपस्थित होत्या.
ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब उप मुख्यमंत्री असताना याच रामटेक निवासस्थानी माझं बालपण गेलं, त्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर मी या बंगल्यात रहायला आले, याठिकाणी मुंडे साहेबांचा फोटो लागला आणि आपल्या सर्वांचे पांग फिटले. आज माझी आई इथे उपस्थित आहे, प्रत्येक आईला आपली मुलगी मोठी व्हावी असे वाटते. आपली मुलगी सर्वांच्या भल्यासाठी काम करत आहे असा विश्वास तीला आहे.
*सर्वांना बळ देऊ*
———
राजकारणात काम करत असताना आतापर्यंत अनेक चढ उतार अनुभवले. कटू प्रसंगानंतर गोड अनुभव देखील आले. सर्व काळात तुमचा पाठिंबा आणि साथ मला लाभली. माझ्या जिल्हयातील कार्यकर्ता स्वाभिमानी आहे. तुमच्यासाठी जे जे चांगले आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या बंगल्यातून सर्वांना बळ देण्याचे काम होईल. नाव माझे असले तरी बंगला तुमचा आहे, त्यामुळे तुमच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे असं ना. पंकजाताई म्हणाल्या.
आ. नमिताताई मुंदडा, माजी आमदार आर टी देशमुख, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, रमेश कराड, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की, राजेश्वर देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, ज्येष्ठ नेते श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, जिल्ह्यातील सर्व सर्व आजी माजी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडल अध्यक्ष, बँकेचे संचालक, सरपंच, लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.