शहरात वीजेचा लपंडाव होऊ नये याकरिता दक्षता घेण्याच्या दिल्या सूचना
बीड प्रतिनिधी :- शहरात वीजेच्या संदर्भात होत असलेल्या अनेक समस्यांच्या बाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी महावितरण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.राजपूत यांची भेट घेत आढावा घेतला. तसेच गुरूवारी (दि.३) रोजी बीड शहरात थोडासा पाऊस झाल्यामुळे जवळपास अर्धी रात्र बीड शहरात वीज नव्हती. अशाप्रकारचा वीजेचा लपंडाव होता कामा नये असे निर्देश आ.क्षीरसागर यांनी महावितरण विभागाला दिले.
गुरुवारी (दि.३) रोजी बीड शहरात अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. पाऊस आल्यानंतर बीड शहरातील जी वीज गायब झाली ते थेट अर्ध्या रात्रीनंतरच आली. त्यामुळे बीड शहरात वीजेच्या लपंडावामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. वीजवितरण विस्कळीत झाल्यास सुरक्षेसह उद्योग-व्यापारांवरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे वीज नियमीत आणि सुरळीत असणे गरजेचे आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.४) रोजी महावितरण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.राजपूत यांची भेट घेतली. शहरातील वीज वितरण व्यवस्था तसेच वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची कारणे यांचा सविस्तर आढावा घेतला. आणि यापुढे असा प्रकार होऊ नये असे सूचित केले. यावर अधिक्षक अभियंता यांनी येणार्या काळात अचानकपणे असा वीजेचा लपंडाव होणार नाही याची दक्षता घेऊ असे आ.क्षीरसगरांना सांगितले.
२२० के.व्ही. च्या विद्युत मार्गिकेचे काम लवकरच होणार
बीड शहरात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लवकरच २२० के.व्ही. च्या नवीन विद्युत मार्गिकेचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बीड शहरात असलेला अतिरिक्त विद्युत भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. असेही आ.संदीप क्षीरसागरांकडून सांगण्यात आले आहे.