रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मेळाव्यात धनंजय मुंडेंना एकमुखी पाठिंबा
आपल्या कामातून सामाजिक न्याय साधणारे धनंजय मुंडे हे परळीचे भविष्य – सचिन कागदे
परळी (प्रतिनिधी) – तुम्हाला व मला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते अगदी मतदान करायला ज्या संविधानाने अधिकार दिला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट व मेहनतीतून देशाचे संविधान निर्माण केलेले आहे. असे संविधान जगात इतर कोणत्याही देशाकडे नाही. मात्र निवडणुका डोळ्यासमोर आल्या की काही लोक जाणीवपूर्वक अमुक पक्षाचे सरकारचे लोक संविधान बदलणार अशा स्वरूपाच्या अफवा पसरवतात आणि समाजाची दिशाभूल करतात. खरंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि त्यांनी निर्मिलेले संविधान हे कुण्या एका समाजासाठी नसून संपूर्ण सार्वभौम भारत देशासाठी आहे; तसेच ते जगासाठी आदर्श आहे. त्यामुळे हे संविधान चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही बदलू शकणार नाही, असे ठाम वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना व्यक्त केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने आज राज्याचे युवक अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष सचिन भैय्या कागदे यांच्या नेतृत्वात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाने धनंजय मुंडे यांना एकमुखी भक्कम पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळीकरांच्या आशीर्वादात इतकी ताकत आहे की मी 19 ला पहिल्यांदा निवडून आल्यास अनपेक्षित पणे सरकारमध्ये सामील झालो आणि मला स्वतः महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाया रचलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री होता आले.
या खात्याचा मंत्री असताना खात्याच्या नावाची व आपल्या परळीच्या मातीची उंची वाढेल असेच काम मी केले त्याचेच फलस्वरूप आज सामाजिक न्याय खाते स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवले आहे.
पूर्वी दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी आंबेडकर आंबेडकरी चळवळ जपण्यासाठी केलेल्या विविध आंदोलनांचीही आठवण यावेळी जागी केली.
धनंजय मुंडे हे सर्व समावेशक व विकासाभिमुख असे नेतृत्व आहे. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. सर्वांना समान संधी देण्याची त्यांची वृत्ती असून आपल्या कामातून कायम सामाजिक न्याय साधणारे धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघाचा सर्वांगीण व सर्व समावेशक विकास करू शकतात, त्यामुळे रिपब्लिकन पक्ष व संबंध आंबेडकर अनुयायी हे मंडळी खंबीरपणे उभे राहतील व परळीच्या या भविष्याला भरभरून मतदान करतील असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते तथा नगर परिषद गटनेते सचिन भैय्या कागदे यांनी यावेळी व्यक्त केले.
या मेळाव्यास ज्येष्ठ नेते आर.एस.व्हावळे, तालुकाध्यक्ष शरण मस्के, शहराध्यक्ष कार्तिक कांबळे, तालुका युवक अध्यक्ष रतन रोडे, भीमराव पवळे, प्रदीप भोकरे, शाहेद खान यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.