बीड प्रतिनिधी : ऊसतोड कामगार व गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी मी प्राधान्याने पुढाकार घेईल. त्यामुळे आगामी पाच वर्षाच्या काळामध्ये मला बीड मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यासाठी निवडून देवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
बीड विधानसभा मतदारसंघातील बालाघाट परिसरात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जि.प.सदस्य रामदास बडे, रामराव खेडकर, देविदास नागरगोजे, विवेक पाखरे, तालुकाध्यक्ष वैशालीताई चौरे, पवन कुचेकर, चंद्रकांत फड, अशोकसेठ लोढा, रविराज तुपे, मुन्ना फड, लालापाटील चौरे, अंकुश गोरे, ओमप्रकाश गिरी, सुरवसे महाराज, अभय फड, संग्राम तुपे आदी मान्यवरांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीड मतदारसंघात आपल्याबद्दल सर्वत्र आत्मियता दिसून येते. समाज एकमेकांशी जुळत चालल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात बालाघाटावर व घाटाच्या खाली शिरूर, नाळवंडी भागात कुठलेही विकासाचे काम झाले नाही. तसेच व्यक्तीगत लाभाचे देखील कुठलीही कामे झाली नाहीत. या आमदाराच्या टक्केवारीतून कोणीही वाचू शकले नाही. सोबतचे सर्व नगरसेवक त्यांना सोडून गेले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते मतदार संघात फिरकले नाहीत. विकासाची कुठलीही कामे केली नाहीत. जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकाळात मात्र खडकी, खंडाळा, वांगी येथे पाझर तलावांची अनेक कामे झाली आणि शेतकर्यांना आपल्या शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याचा दिलासा मिळाला. या निवडणूकीत आण्णांनी आपल्याला जाहीर पाठिंबा देवून मोठे पाठबळ पाठीशी उभे केले. त्यामुळे मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली आहे. या शक्तीच्या व मार्गदर्शनाच्या बळावर मी मतदार संघात आगामी काळात अनेक विकास कामे हाती घेईल. बालाघाटावर आरोग्य केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेईल. बीड येथे वैद्यकीय महाविद्यालय आणून, ग्रामीण दुष्काळी भागातील गोरगरीब जनता व ऊसतोडणी कामगारांना मोफत आरोग्य सेवा व त्यांच्या मुलांना शैक्षणिक फीसमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न करेल. या विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीचे सर्वजण एकत्र येवून तन-मन-धनाने काम करीत आहेत. त्यामुळे येणार्या काळात मला अधिक काम करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल. विकासाच्या मुद्यावर जर आपण मतदान केले तर नक्कीच मतदार संघाचे चित्र बदलेल. त्यामुळे येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या पाठीशी आपले प्रेम व आशिर्वाद द्यावेत असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. यावेळी चंद्रकांत फड, देविदास नागरगोजे, वैशालीताई चौरे यांची भाषणे झाली. अशोक रसाळ यांनी प्रास्ताविक केले. चौरे यांनी आभार मानले.