बीड प्रतिनिधी : मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे, आणि त्याच परिसराने मला ताकद दिली आहे. हीच ताकद आता योगेश क्षीरसागरच्या पाठीशी उभी राहावी, अशी अपेक्षा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्याचा गजर संपूर्ण बीड जिल्ह्यात घुमला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
बीड शहरातील जी.एन. फंक्शन हॉलमध्ये आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश काळे, विलास बडगे, नवीद उजमा, हाफिज साहब, मुखीद लाला, वाजिद कुरेशी, हरून हाजी साब, खलील हाफिज यांची उपस्थिती होती.
लोकशाही आणि मतदारांची भूमिका:
जयदत्त क्षीरसागर यांनी पुढे बोलताना मतदारांना उद्देशून सांगितले की, “समस्या अनेक आहेत, पण त्या सोडवण्यासाठी संविधानिक पदाची गरज असते. निवडणुका सत्ता येण्यासाठी किंवा जाण्यासाठी नसतात, तर आपल्या समस्या कोण सोडवेल यासाठी असतात. गेल्या पाच वर्षांत चुकीच्या निर्णयांचे परिणाम आपण अनुभवले आहेत. त्यामुळे यावेळी योग्य उमेदवार निवडणे महत्त्वाचे आहे. मी कधीच मुस्लिम समाजापासून अंतर ठेवले नाही. आपले नाते विश्वासाचे आणि प्रेमाचे आहे, जे मी कधीच ढळू देणार नाही. आपले मत अमूल्य आहे; त्याचा वापर विचारपूर्वक करावा. आम्ही वाळूचा ठेका, गुटखा विक्री किंवा क्लब चालवण्यास इच्छुक नाही. आम्ही जनसेवेसाठी कटीबद्ध आहोत. या उद्दिष्टांसाठी माझ्या नेतृत्वाखाली योगेश क्षीरसागर काम करेल, याची मला खात्री आहे. यावेळी नवीद उजमा यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले की, भावनिक वातावरण निर्माण करून हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न होईल. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. समस्यांचे निराकरण करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा. जयदत्त क्षीरसागर यांनी नेहमीच आपला साथ दिली आहे. योगेश क्षीरसागर हे तरुण, हुशार, आणि विकासशील दृष्टिकोन असलेले उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा देणे, म्हणजे आपल्या समाजाच्या विकासाला पाठिंबा देणे आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मतदारांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या आवाहनाला पाठिंबा व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार सचिन उबाळे यांचा पाठिंबा
ज्ञानराधा, मॉ साहेब जिजाऊ, साईराम अर्बन, राजस्थानी, लक्ष्मीमाता मल्टीस्टेट, अर्बन, पतसंस्था ठेवीदारांचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार प्रा.सचिन उबाळे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठींबा दिला. त्याबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आभार मानले. तसेच, ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मी आगामी काळात आवाज उठवणार आहे, असे सांगितले.