जाहिरनामा गेवराईचा घोषणापत्र’ चा प्रकाशन समारंभ संपन्न
गेवराई प्रतिनिधी – सामान्य माणसाचा विकास हाच केंद्रबिंदू घेवून विकासाच्या मुद्यावर विधानसभा निवडणुक लढवत आहोत. गेवराई शहर व ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत, विकासाचा रथ गतीने पुढे घेवून जायचा आहे, विकासाचे टाईमिंग साधण्यासाठी येणाऱ्या २० तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले. ‘जाहिरनामा गेवराईचे घोषणापत्र’ चे प्रकाशन प्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ ‘जाहिरनामा घोषणापत्र’ चा प्रकाशन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाडळसिंगी येथील अमोल काळे यांच्या प्रयत्नांतून गीतकार व गायक मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या प्रचार गितांचे लाँचिंग करण्यात आले. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, रिपाई कवाडी गटाचे अनिल तुरूकमारे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, वीर लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब रोकडे यांच्या हस्ते जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विजयसिंह पंडित म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्ता असताना दहा वर्षे आमदार राहिलेले विद्यमान लोकप्रतिनिधी हे फक्त कोल्हेर रोडच्या विकासातच मग्न आहेत. कोल्हेर रोडचाच विकास करणाऱ्या व आजारी असल्याचे कारण सांगून मागील चार ते पाच वर्षे नॉट रिचेबल राहणाऱ्याला गेवराईकर नक्कीच धडा शिकवतील असे सांगून येणाऱ्या काळामध्ये आपण गेवराईतील अतिक्रमण बाधितांना पीटीआर देण्यासाठी प्रयत्न करू, तालुक्यातील तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा विकास करण्याबरोबरच विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातील. जाहिरनाम्यामध्ये आपण करावयाच्या कामाची सर्व वचने दिली असून ती प्रामाणिकपणे पूर्ण केली जातील असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, विकासाचे न बोलता उटसूट आमच्यावर टिका करणाऱ्या विद्यमान आमदाराला गल्लीतून चौकात आम्हीच आणले आहे. दोन्ही विरोधकांमध्ये छुपी युती आहे, त्याला मतदार कधीच फसणार नाहीत. आम्ही कधीच राजकीय जीवनात संकुचित विचार करून राजकारण केलेले नाही, सर्वांगिन विकास हाच आमचा ध्यास असून शहरातील अहिल्यानगर, साठेनगर, गौरीपूरनगर, कल्पेश्वर मळा येथील रस्ते आणि उमापूर व तलवाडा येथे मुस्लिम समाजासाठी आधुनिक सुविधांनी युक्त असा शादीखाना उभारण्यात येईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी पक्ष व इतर मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.