नाळवंडी येथे भाऊसाहेब डावकर यांच्या
पुढाकारातून ४० शाळांना संगणक वाटप
बीड प्रतिनिधी : देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षण देणे काळाची गरज बनली असून ती आपली जबाबदारी आहे. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये तरुणांना रोजगार मिळवून देणारे विविध अभ्यासक्रम आणण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.
बीड तालुक्यातील नाळवंडी येथील निवासी आश्रमशाळेत शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.राजेंद्र राऊत हे होते. व्यासपीठावर अरुण लांडे, सुधीर काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य अच्युतराव शेळके, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, युवा नेते अशोक वाघमारे, माजी नगरसेवक रमेश चव्हाण, सुनिल सुरवसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, माजेद कुरेशी, सरपंच भारत कानडे, सरपंच रवी गंगावणे, सरपंच तेजाब चव्हाण, अशोक वैद्य, बाबासाहेब शिंदे, शाम राऊत, बाळासाहेब डोळस, संजय काळे, बाळराजे राठोड, भगीरथ बांडे, मिलिंद ठोकळ, अभिमान गुंदेकर, प्रा.अमोल घुमरे, बाळू आमटे आदींची उपस्थिती होती.
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, माझे सहकारी भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० संगणक संच जिल्हा परिषद शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच तांत्रिक शिक्षण मिळेल. त्यातून विद्यार्थी अभ्यासू होतील. बीड विधानसभा मतदारसंघात स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली. या क्षेत्रात अलीकडे अमुलाग्र बदल झाले आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगार मिळवून देणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले. यावेळी भाऊसाहेब डावकर यांचा सत्कार करून मान्यवरांनी नाळवंडी जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वितरित केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.