मुख्य आरोपी बबन शिंदेला तात्काळ अटक करा …!
थोडा वेळ द्या निश्चित न्याय देऊ – अविनाश बारगळ
बीड प्रतिनिधी : जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट बीड 200 कोटी ठेव घोटाळा गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबन शिंदे याला तात्काळ अटक करून गुन्ह्याचा फेर तपास करावा. एम पी आयडी 1999 कायद्या अंतर्गत पाठवलेला प्रस्ताव अपूर्ण असून, या प्रस्तावात मुख्य आरोपी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांची बीड जिल्हा बाहेरील मालमत्ता शोधून जप्तीची कारवाई करावी. एस आय टीचे पुनर्गठन करण्यात यावे. या विविध मागण्यासाठी जिजाऊ मल्टीस्टेट ठेवीदारांनी बीडचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ यांची भेट घेतली. थोडा वेळ द्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतो. कसून चौकशी करून ठेवीदारांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अशोकराव हिंगे, अॅड. अप्पासाहेब जगताप, डॉ. अरविंद काकडे, मारुती तिपाले, शेख कुतुब भाई, भाऊसाहेब परसे, इंजि. सखाराम कळासे, चंद्रकला बांगर, विशाखा सूर्यवंशी, मीरा सोनवणे, रवींद्र पालीमकर, अच्युत वाघ, सूर्यभान नवले, डॉ. उमरजकर, सुभाष शिराळे, प्रवीण पोकळे, महेश साळप्पा, अच्युत सावंत, इंजि. मुलाणी आदिसह ठेवीदार उपस्थित होते.
जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात 03 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद झाला. 02 फेब्रुवारी 2024 रोजी एस आय टीची नेमणूक झाली. दुर्दैवाने एसआयटी पथकातील तपास अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे एक कोटी लाच प्रकरणात अडकले. पो.नि खाडे यांनी सुरवातीपासून मुख्य आरोपी शिंदे सह सर्व आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केली. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वांढरे व बबन शिंदेचा मुलगा मनीष शिंदे अंतरिम जामीनवर उजळ माथ्याने फिरत आहेत. ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने तपास न झाल्याने ठेवीदार बांधव संतप्त आहेत. यापूर्वी अनेकदा पोलीस अधीक्षक व वरिष्ठांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. मात्र याबाबत गंभीर पाउल पोलीस प्रशासनाने उचलेले नाही. नूतन पोलीस अधीक्षका मार्फत न्याय मिळवण्यासाठी ठेवीदारांनी नूतन पोलीस अधीक्षकाकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्री बारगळ यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या कामाचा अनुभव असल्याने जिजाऊ मॉंसाहेब ठेवीदारांना न्याय देण्यासाठी निश्चित सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवीदारांकडून व्यक्त केली जात आहे