बीड प्रतिनिधी : स्थानिकच्या काही लोकांनी आपल्या विरुध्द पक्षश्रेष्ठींचे कान भरले होते. बीड विधानसभा निवडणूकीसाठी मी जोरदार तयारी केलेली असताना पक्षाने बीड विधानसभा क्षेत्र दुसर्याला दिल्याने आपण चार महिन्यापुर्वीच खा.श्रीकांत शिंदे व शिवसेना सचिव संजय मोरे यांची भेट घेवून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली असा दावा साफ चुकीचा आहे असे प्रतिपादन कुंडलिक खांडे यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खांडे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने शिवसेनेचे मी प्रामाणिकपणे काम केले. जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसर्या पक्षातून आलेल्या अनिल जगताप यांना बीड विधानसभा क्षेत्राचा कार्यभार दिल्याने मी नाराज होतो. वास्तविक बीड विधानसभा क्षेत्रात मी शिवसेना पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात केली होती. विधानसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना मला बीड विधानसभा क्षेत्रापासून दुर करण्याचा प्रयत्न झाल्याने मी व्यथित झालो होतो. दि.28 जानेवारी 2024 रोजी मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खा.श्रीकांत शिंदे व शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता. परंतु अद्यापपर्यंत तो त्यांनी स्विकारला नाही.त्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली असे म्हणणे साफ चुकीचे आहे. शिंदे साहेबांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील व्यक्तीवर खुप प्रेम केले. शिदे साहेबांच्या विश्वासाला मी कधीही तडा जावू दिला नाही. मात्र स्थानिकच्या पदाधिकार्यांनीच माझ्या विरुध्द कटकारस्थान करुन मला शिवसेनेपासून दुर होण्यास भाग पाडले असल्याचे कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे.मी माझा राजकिय निर्णय लवकरच प्रसार माध्यमांना कळवणार आहे.