आष्टी प्रतिनिधी : खरीप हंगाम 2023 – 24 चा अग्रिम पिकविमा वाटप झाला आहे, मात्र त्यानंतर नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच्या शेतकऱ्यांनी रीतसर ऑनलाइन तक्रार केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई रकमेची वितरण झालेले नाही. ए.आय.सी. इंडिया या पिकविमा कंपनीने तात्काळ नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम अदा केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती अदा केली जात नाही. खरीप हंगामातील पेरण्या उरकत आलेले आहेत. काही ठिकाणी पेरण्या होऊन मशागतीचे देखील कामे उरकले जात आहेत.अशा वेळी गेल्या वर्षीच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झालेले म्हणून कंपनीकडे रीतसर ऑनलाईन तक्रार केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळायला हवी होती. त्या शेतकऱ्यांना या रकमेतून मदत मिळेल मात्र ती रक्कम अद्याप देखील मिळाली नाही. विलंब न करता संबंधित पिकविमा कंपनीने ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.