निवडणूक निकालाच्या विवंचनेतून आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणेच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट
आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार – धनंजय मुंडे
अंबाजोगाई – लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा गावच्या पांडुरंग सोनवणे या तरुणांनी आत्महत्या केली होती आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
निवडणुकांमध्ये जय – पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान मयत पांडुरंग सोनवणे (वय 33) यांस एक मुलगा, मुलगी, पत्नी, आई व वडील असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पांडुरंग यांच्या मुलांना देण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, डीघोळ आंबा गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, भरत सोनवणे, कैलास सोनवणे, दत्ता सोनवणे आदी उपस्थित होते.