सुरेश कुटे फसवणूक करून फरार झाल्याची शहर ठाण्यात फिर्याद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळा करण्यात येत असल्यामुळे आज बीड शहर पोलीस ठाण्यात सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्यासह इतर पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक करत ते फरार झाले असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांनी संयम ठेवला होता, परंतु सुरेश कुटे यांनी दिलेल्या तारखा न पाळल्यामुळे आता ठेवीदारांचा संयम सुटू लागला आहे. यातूनच आता गुन्हे नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. बीड शहरातील महादेव मन्मंथअप्पा आंधळकर यांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे बीड शहरातील शिवाजीनगर शाखा ज्ञानराधा येथे नऊ लाख रुपये ठेवले होते. परंतु या शाखेतून पैसे देण्यास गेल्या अनेक महिन्यापासून टाळाटाळ होत असल्यामुळे आज आंधळकर यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात सुरेश कुटे विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये सुरेश ज्ञानोबा कुटे, अर्चना सुरेश कुटे, वाय. व्ही. कुलकर्णी, नारायण सुगंधराव शिंदे, सुशील श्रीराम हाडुळे, श्रीकांत आबासाहेब आमटे, शिवाजीनगर शाखेचे मॅनेजर घोडके व इतर सर्व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.